छत्रपती संभाजी महाराजांवरील चित्रप्रदर्शन बंद पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 07:52 AM2019-05-27T07:52:06+5:302019-05-27T07:52:30+5:30
संतप्त छत्रपती संभाजीराजेप्रेमींकडून आक्षेपार्ह सात चित्रे ताब्यात; संयोजकांची दिलगिरी
कोल्हापूर : मुंबईच्या आर्ट रिव्होल्युशनतर्फे ‘द अनडिफिटेड सेकंड किंग ऑफ स्वराज्य.. संभाजी महाराज’ या नावाने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलची आक्षेपार्ह चित्रे लावण्यात आली होती. याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या छत्रपती संभाजीराजेप्रेमींनी रविवारी रात्री प्रदर्शन बंद पाडत त्यातील आक्षेपार्ह सात चित्रे ताब्यात घेतली. आक्षेपार्ह चित्राबद्दल संयोजिका स्मृती शिरसाट यांनी माफी मागितली.
शाहू स्मारक भवनात २६ मे ते १ जूनदरम्यान मुंबईतील चित्रकार स्मृती शिरसाट यांनी आर्ट रिव्होल्युशन संस्थेतर्फे ‘द अनडिफिटेड सेकंड किंग ऑफ स्वराज्य.. संभाजी महाराज ’ या नावाने चित्रप्रदर्शन भरविले होते. याचे उद्घाटक म्हणून निमंत्रण पत्रिकेवर संयोगीताराजे यांच्या नाव परवानगी न घेता छापले होते. दरम्यान, सायंकाळी सात वाजता शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे पदाधिकारी फत्तेसिंह सावंत यांनी प्रदर्शनास भेट देत चित्रांची पाहणी केली. त्यात छत्रपती संभाजी महाराज यांचा सात देशांत पुर्नजन्म झाला तर ते कसे दिसतील याबद्दलची सात आक्षेपार्ह चित्रप्रदर्शनात लावल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही बाब त्यांनी खासदार संभाजीराजे यांना सांगितली. त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास खासदार संभाजीराजे यांचे स्वीय सहायक अमर पाटील हे संभाजीराजेप्रेमींसह शाहू स्मारक भवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी संयोजिका स्मृती शिरसाट यांना आक्षेपार्ह चित्रांबद्दल खडसावले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी चित्रप्रदर्शनात जाऊन त्यातील सात चित्रे ताब्यात घेतली.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान अशाप्रकारचे चित्रप्रदर्शन महाराष्ट्रासह जगात कुठेही न लावण्याबद्दलची लेखी हमी देण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार शिरसाट यांनी त्वरित कार्यकर्त्यांची माफी मागितली व येथून पुढे अशाप्रकारची आक्षेपार्ह चित्रे लावणार नाही, अशी हमी देत दिलगिरी व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी सकाळी लेखी माफीनामा व हमीपत्र द्यावे, अशी मागणी केली. त्यावर शिरसाट यांनी ते देण्याचे मान्य केले. त्यानंतर संतप्त झालेले कार्यकर्ते शाहू स्मारकातून बाहेर पडले.