कृषी प्रदर्शनातून कुरुंदवाडच्या यात्रेला गतवैभव
By admin | Published: March 13, 2016 11:33 PM2016-03-13T23:33:24+5:302016-03-14T00:06:05+5:30
यात्रेकरूंत समाधान : सत्तर वर्षांपूर्वी पटवर्धन सरकारांनी सुरू केलेली परंपरा पालिकेकडून पुन्हा सुरू
गणपती कोळी -- कुरूंदवाड -कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, जनावरांची देवाण-घेवाण व्हावी, या उद्देशाने सुमारे ७0 वर्षांपूर्वी येथील पटवर्धन सरकारांनी महाशिवरात्रीनिमित्त पशू व कृषी प्रदर्शन चालू केले होते़ बदलत्या काळात कृषी प्रदर्शन गायब होऊन केवळ यात्राच शिल्लक राहिली होती़ नगरपालिकेने यंदा भव्य कृषी प्रदर्शन भरवून या यात्रेला गतवैभव मिळवून दिल्याने यात्रेकरूंमधून समाधान व्यक्त होत असून, ही परंपरा कायम राखण्याची गरज व्यक्त केली जात आहे़
कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे़ या संस्थानात बेळगावपर्यंत कर्नाटक- महाराष्ट्रातील गावांचा समावेश होता़ या भागातील शेतकऱ्यांना शेतातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, जातिवंत जनावरांची देवाण-घेवाण व्हावी़ या उद्देशाने चिंतामणराव पटवर्धन सरकारने १९४३ साली ऐतिहासिक पंचगंगा कृष्णा घाट रस्त्यावर सुमारे दीडशे एकर क्षेत्रात प्रदर्शन भरविले होते़ ते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पशू व कृषी प्रदर्शन म्हणून गणले जात होते़ यात्रा व प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह चिक्कोडी, अथणी, निपाणी, बेळगाव, आदी भागांतील शेतकरी बैलगाडीने यात्रेस येत़ त्याशिवाय जनावरांचे व्यापारी, शौकीन आदी आवर्जून उपस्थिती लावतात. यात्रेकरूंचा चार-चार दिवस मुक्काम होत असे़
नगरपालिकेच्या स्थापनेनंतर या यात्रेचे नियोजन पालिकेकडे आले़ मात्र, परिस्थिती बदलली़ अनेक ठिकाणी भरत असलेले शेती प्रदर्शन, नवीन कृषी तंत्रज्ञानामुळे जनावरांची घटती संख्या, वाहतुकीची निर्माण झालेली साधने याबरोबरच यात्रा समितीच्या नियोजनाचा व निधीचा अभाव, जागेची कमतरता, आदी कारणांमुळे यात्रेतील प्रदर्शन गायब होऊन केवळ यात्राच शिल्लक राहिली होती़
यात्रेतील कृषी प्रदर्शनाला गतवैभव मिळवून देण्यासाठी यात्रा कमिटीने भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे़ यामध्ये शेतापासून ते माणसाला लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे सुमारे दीडशेहून अधिक स्टॉल या प्रदर्शनात सहभागी झाले असून, प्रदर्शनाला यात्रेकरूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़ यात्रेतील लोप पावत असलेले कृषी प्रदर्शन पालिका व यात्रा समितीने पुन्हा चालू केल्याने यात्रेकरूंतून समाधान व्यक्त होत असून ही परंपरा कायम राखण्याची गरज आहे़
बालचमू व विद्यार्थ्यांसाठी हस्तकला (चित्रकला, पोस्टर्स) प्रदर्शन ठेवून या कलेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते़ प्रदर्शनातील ही परंपरा आजही जिवंत असून विद्यार्थ्यांकडून या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे़
प्रथमच मोठ्या प्रमाणात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनावर विधान परिषदेचे सावट पसरले होते़ प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते झाले़ यावेळी झालेल्या सभेत नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी प्रदर्शनात विरोधी नगरसेवकांतून केले जात असलेले अडथळे, अनेकांनी दिलेला चकवा या संघर्षातून डोळ्यातून आलेले अश्रू, विठ्ठलराव निंबाळकर यांनी दिलीप पाटील यांना ‘गोकुळ’मध्ये पुन्हा स्थान देण्याची केलेली मागणी, या सर्वांचा धागा धरून महाडिकांनी विरोधकांना दिलेले आव्हान व समर्थक यात्रा समितीला दिलेला आधार व प्रोत्साहन यामुळे कृषी प्रदर्शन हे राजकीय प्रदर्शनच जाणवत होते़