साळवणमधील भवानी मातेच्या मंदिराचा ‘वनवास’च सुटेना

By admin | Published: October 23, 2014 10:19 PM2014-10-23T22:19:00+5:302014-10-23T22:49:08+5:30

पर्यटन विकासाची मोठी संधी : सरस्वती-जांभळी नद्यांच्या संगमावर मंदिर

The 'exile' of the temple of 'Bhavani Mata' in Salvati is 'exile' | साळवणमधील भवानी मातेच्या मंदिराचा ‘वनवास’च सुटेना

साळवणमधील भवानी मातेच्या मंदिराचा ‘वनवास’च सुटेना

Next

एम. ए. शिंदे - साळवण पोलीस ठाण्याच्या पीछाडीस उंच डोंगरावर वनराईत वसलेले भवानी मातेचे मंदिर पर्यटनदृष्ट्या उपेक्षित आहे. सरस्वती-जांभळी नद्यांच्या संगमावरील या मंदिराचा व टेकडीचा शासनाने विकास आराखडा तयार करून परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होईल.
वनविभागाच्या हद्दीतील सागवानी वनात हे मंदिर आहे. पूर्वीच्या जुन्या मंदिराकडे भाविक जाण्यास धजत नसत. साळवण पोलीस ठाण्याच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. चार फूट रुंदीच्या या रस्त्याची अवस्था कुठे दगड, तर कुठे खड्डा, अशी असून, याच रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे रस्त्याची धूप होऊन रस्त्यातच घळण निर्माण झाली आहे. या ठिकाणी पक्का रस्ता झाला तरच दुचाकी व चारचाकी वाहने मंदिरापर्यंत पोहोचतील.
मंदिर पूर्वाभिमुख असून, सध्या आर.सी.सी. पद्धतीचे बांधकाम झाले आहे. सततच्या पावसामुळे मंदिराच्या वरच्या बाजूला स्लॅबवर गवत उगवले आहे. मंदिराची समोरील भिंत काळवंडली आहे. दरवाजा लोखंडी ग्रीलचा असून, त्यावर गंज चढू लागला आहे. मंदिराच्या पायाकडील बाजूचे दगड निखळू लागले आहेत. मंदिरासमोर चौथरा आहे; मात्र त्या चौथऱ्यावर फरशी नाही. चारही भिंती शेवाळल्या आहेत. मंदिर पायऱ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी पत्र्याचे मंदिर आहे. अडीच ते तीन फूट उंचीच्या भिंतीवर मारलेला पत्रा सध्या सडण्याच्या अवस्थेत आहे. पत्रा वाऱ्यामुळे उडून जाऊ नये म्हणून त्यावर विटा ठेवलेल्या आहेत. मंदिरासमोर नंदी आहे; मात्र नंदीची झीज होऊ लागली आहे. मंदिरात महादेवाची पिंड आहे. मंदिर टेकडीच्या उजव्या बाजूने जांभळी, तर डाव्या बाजूने सरस्वती नदी वाहत गेली असून, टेकडीच्या पूर्वेकडील बाजूस दोन्ही नद्यांचा संगम झाला आहे. संगमापासून पुढे या नदीला कुंभी म्हणून ओळखले जाते. संगमाजवळील पात्रात पर्यटकांच्या दृष्टीने बोटिंग सुरू करता येणे शक्य आहे. नदीपात्रातील पाणी लिफ्ट करून मोठा आकर्षक बगीचा तयार करणे शक्य आहे. वनविभागाने यापूर्वी विकास आराखडा तयार केला होता; पण त्याचा पाठपुरावा झाला नाही. (वार्ताहर)

भवानी मातेच्या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. हा वनविभागाचा परिसर असल्यामुळे वनविभाग व पर्यटन विकास महामंडळ यांनी सामुदायिक प्रयत्नांतून विकास करावा. पर्यावरणाचा ऱ्हास न होता विकास व्हावा. पर्यटन खात्याने वेगळा निधी द्यावा यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची गरज आहे.
- संभाजी भालेकर,
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: The 'exile' of the temple of 'Bhavani Mata' in Salvati is 'exile'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.