ग्राम दक्षता समित्यांचे अस्तित्व मांडव घालण्यापुरतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:07+5:302021-04-02T04:23:07+5:30
कोल्हापूर: कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पुन्हा लॉकडाऊनचे नगारे वाजू लागले तरी गावागावात मात्र ...
कोल्हापूर: कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पुन्हा लॉकडाऊनचे नगारे वाजू लागले तरी गावागावात मात्र अजूनही शांतताच आहे. कोरोनाच्या दक्षतेसाठी गेल्या वर्षी स्थापन केलेल्या दक्षता समित्याही सुस्तावल्या असून लसीकरणासाठी मांडव घालण्यापुरतेच त्यांचे अस्तित्व राहिले आहे. बाकी प्रबोधन वगैरे कुठेही दिसत नाही.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने राज्य सरकारने अंशत: लाॅकडाऊनची तयारी म्हणून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. रात्री आठनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांचे शटर डाऊन होत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गावपातळीवरील दक्षता समित्यांनी पुन्हा कामास लागावे असे आदेश दिले आहे. याला आठवडाभराचा कालावधी होत आला तरी समित्या अद्याप सक्रिय झालेल्या नाहीत.
कोरोनाचा कहर शिथिल झाल्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होऊन नवीन कारभारी सत्तेवर आले आहेत. गावपातळीवरील दक्षता समित्यांमध्ये विद्यमान सरपंचांचाही समावेश आहे. नवे कारभारी सत्तेवर आलेल्या गावांमध्ये नव्या समित्यांची स्थापना होणे अपेक्षित होते. पण ते अद्याप झालेले नसल्याने जुन्याच समित्या आपल्या सवडीनुसार काम पाहत आहेत. कोरोनाविषयी जनजागृती, कंटेन्मेंट झोन इत्यादीविषयी त्यांच्याकडून पूर्वीसारखा पाठपुरावा होत नाही. गावात रुग्ण आढळला तर त्याच्या नियोजनची जबाबदारी या समित्यांकडे होती, पण आता कोणी कुणाला आदेश द्यायचा यावरुन संभ्रम असल्याने बऱ्यापैकी अंग काढून घेतल्याचेच चित्र गावोगावी दिसत आहे. कोराेना काळात ग्रामसमित्यांनी केलेल्या कडक निर्बंधाचा व सोईच्या भूमिकांचा हिशेब ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी चुकता केलेला असल्याने घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणार कोण? अशीही मानसिकता समिती सदस्यांची दिसत आहे.
सध्या कोरोना लसीकरण सुरू असल्याने या दक्षता समित्यांनी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्यांना बैठकीची व्यवस्था, उन्हापासून रक्षणासाठी मंडप घालणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे इतकीच कामे केली जात आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी अजूनही ती आवाक्यात असल्याने गावोगावी त्याबद्दल अजूनही फारशी दक्षता बाळगली जात नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळेही समित्या स्थापन करून कोरोना उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्यावर्षी कोरोनाबद्दल सुरुवातीच्या टप्प्यात प्रचंड भीती होती. त्यावेळी ग्रामसमित्यांनी चांगले काम करून दाखविले.