पंतप्रधानांसह, मंत्री, देवस्थानांना सुरक्षाकवच देणाऱ्या ‘मार्शल’ला अखेरचे वंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 01:12 PM2022-06-05T13:12:02+5:302022-06-05T13:21:37+5:30

पोलीस पथक हळहळले : आठ वर्षे दलाची सेवा

Exit of the Prime Minister, the Minister, the 'Marshals' who provide security to the temples | पंतप्रधानांसह, मंत्री, देवस्थानांना सुरक्षाकवच देणाऱ्या ‘मार्शल’ला अखेरचे वंदन

पंतप्रधानांसह, मंत्री, देवस्थानांना सुरक्षाकवच देणाऱ्या ‘मार्शल’ला अखेरचे वंदन

googlenewsNext

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील अनेक मंत्री महाराष्ट्रातील देवस्थानांच्या प्रमुख यात्रांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षाकवच म्हणून पोलीस दलात आठ वर्षे राबलेल्या ‘मार्शल’(वय १४) या श्वानाने निवृत्तीकाळात रविवारी अखेरचा श्वास घेतला. सांगलीवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांगलीतील ‘बॉम्बशोधक व घातपातविरोधी पथका’त त्याने तब्बल आठ वर्षे सेवा बजावली होती. त्याचा जन्म २५ मे २००९ रोजी झाला होता. २०१० मध्ये पुण्यात प्रशिक्षण पूर्ण करुन तो सांगलीच्या पोलीस दलात दाखल झाला होता. चणाक्ष बुद्धीच्या मार्शलने अल्पावधित पोलीस दलात लोकप्रियता मिळवली. पोलीस अधिकाऱ्यांनीही अनेकदा या श्वानाचे कौतुक केले. २०१० ते २०१८ या कालावधित त्याने पोलीस दलासह, लोकप्रतिनिधी व नागरिकांची सेवा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगली दौऱ्यावेळी घातपातविरोधी तपासणीचे काम याच श्वानाने केले होते. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या दौऱ्यातील सुरक्षा कमानही अनेक वर्षे त्याने सांभाळली. नाशिकचा कुंभमेळा, पंढरपुरातील आषाढी, कार्तिकी यात्रा, तुळजापुरातील नवरात्रोत्सव अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या सुरक्षेचा भार मार्शलने पेलला होता. सांगलीतील पंचायतन गणपती मंदिरापासून येथील अनेक उत्सवातही त्याने घातपातविरोधी सुरक्षेची सेवा दिली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये त्याच्या बुद्धीची चाचणी घेण्यात आल्यानंतर दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा गौरवही केला होता. संजय कोळी, समीर सनदी, संतोष माळी या तीन हँडलरकडे तो आठ वर्षे सेवेत होता.

निवृत्तीचा सोहळाही चर्चेत

सांगली पोलीस दलातून तो एप्रिल २०१८ मध्ये निवृत्त झाला. पोलीस कर्मचाऱ्याप्रमाणे दलाने त्याचा निवृत्ती सोहळा आयोजित केला होता. त्यानंतर त्याचे हँडलर संजय कोळी यांच्याकडे तो राहिला. निवृत्तीनंतर ४ वर्षे विश्रांती घेऊन रविवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.
 

Web Title: Exit of the Prime Minister, the Minister, the 'Marshals' who provide security to the temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.