विस्तारच ठरतो विकासात अडथळा

By admin | Published: February 27, 2015 11:07 PM2015-02-27T23:07:17+5:302015-02-27T23:17:28+5:30

स्मशानभूमी, रस्त्यांची दूरवस्था : जुनी स्वच्छतागृहे दुरुस्ती, नुतणीकरणाच्या प्रतीक्षेत

Expansion leads to development hinders | विस्तारच ठरतो विकासात अडथळा

विस्तारच ठरतो विकासात अडथळा

Next

संकपाळ नगर, निगवे नाका, दत्तमंदिर अशा तीन झोपडपट्ट्यांसह आंबेडकरनगर, सावरकर नगर, जय शिवराय कॉलनी, हनुमान तलाव, पिंजार गल्ली, शिंदे गल्ली, वाडकर गल्ली, अशा विस्तीर्ण आणि विचित्र प्रभाग रचनेमुळे विकासकामे करताना अडथळे येणारा प्रभाग म्हणून कसबा बावडा, हनुमान तलावकडे पाहिले जाते. नगरसेवकांचा संपर्क भागात चांगला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, रस्त्यावरील दिवे यांची स्थिती बऱ्यापैकी आहे. मात्र, मोडकळीस आलेली स्मशानभूमी, शौचालये, आंबेडकरनगरमधील खराब झालेले रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
राजाराम बंधाऱ्यापासून ते प्रिन्स शिवाजी शाळेपर्यंत तसेच मूळ गावठाणातील काही गल्ल्यांमध्ये हा प्रभाग विखुरलेला आहे. त्यामुळे या प्रभागात प्रत्येक नागरिकासी संपर्क साधून नागरी वस्तीपर्यंत पोहोचताना नगरसेवकाला तारेवरची कसरत करावी लागते. मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांची या ठिकाणी जास्त वस्ती आहे.
प्रभागात (राजाराम बंधाऱ्याजवळ) स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीवर प्रस्तावित शंभरफुटी रस्ता जात असल्याने स्मशानभूमीचे दोन भाग होणार आहेत. त्यामुळे स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे म्हणावे तसे पालिकेचे लक्ष नाही. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी आंदोलने झाली, निधीची घोषणा झाली; परंतु स्मशानभूमीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. स्मशानभूमीतील राख सध्या थेट पंचगंगा नदीत सोडली जाते. नगरसेवकांनी काही प्रमाणात स्मशानभूमीचे काम केले आहे; परंतु ते अपूर्ण आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण सांगितले जात आहे.
या प्रभागात तब्बल १५० सार्वजनिक शौचालये व दहा मुताऱ्या आहेत. ही शौचालये २५ ते ४० वर्षांपूर्वीची असल्याने मोडकळीस आलेली आहेत. किरकोळ दुरुस्ती करण्याऐवजी ही शौचालये पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे. प्रभागात ठिकठिकाणी दहा मुताऱ्या आहेत. त्यांचीही मोडतोड झालेली आहे. काही मुताऱ्यांना आडोसा नाही. यात प्रभागातील हनुमान तलाव, मिनी चौपाटीचीही काही प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. नगरसेवकांनी खेळण्यांची दुरुस्ती करून काही ठिकाणी विद्युत बल्ब बसविले आहेत; परंतु तलावातील पाणी मोठ्याप्रमाणात दूषित झाले आहे. तसेच त्या पाण्याच्या बाजूला गवत, झुडुपे वाढलेली आहेत. त्यामुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा येते.
प्रभागातील प्रिन्स शिवाजी नगर झोपडपट्टीतील नागरिक प्रॉपर्टीकार्डाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ७/१२ मिळावा म्हणून ते प्रतीक्षेत आहेत. नगरसेवकांनी अशा १५४ फायली महानगरपालिकेकडे सादर केल्या आहेत; परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही. प्रभागात अन्य ठिकाणाचे रस्ते चांगले आहेत. पिण्याच्या पाण्याची तक्रार नाही. रस्त्यावरील दिव्यांची सोयही चांगली आहे. मात्र, काही ठिकाणी रस्ते साफ करायला आणि गटारींची स्वच्छता करायला मनपा कर्मचारी येत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे.

प्रभागाचा विस्तार खूप मोठा आहे. त्यामुळे विकासकामे करताना निधीअभावी अनेक अडचण येतात. तरीही आतापर्यंत तब्बल चार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. भागात पाईपलाईन टाकून पिण्याचा पाण्याची चांगली सोय केली आहे. दहा लाख रुपयांचे एलईडी बल्ब बसविले आहेत. स्मशानभूमीत पेव्हर बॉक्स बसविले. निधी उपलब्ध झाल्यास अन्य कामे केली जातील. भागातील रस्ते केले. आंबेडकरनगरमधील रस्ते लवकरच केले जातील. प्रभागात ४८ घरकुल योजना मार्गी लावली. गटारी केल्या. चॅनेल बांधले. यासाठी माजी मंत्री सतेज पाटील व महापालिका यांच्याकडून निधी उपलब्ध झाला. - डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक.

Web Title: Expansion leads to development hinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.