‘राजाराम’च्या विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प निर्मितीचा घाट कशासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:03+5:302021-03-16T04:25:03+5:30
बावड्यातील शेतकऱ्यांची कारखान्याकडे लेखी मागणी लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : राजाराम कारखान्यावर २६८ कोटी रुपयांचे कर्ज व ...
बावड्यातील शेतकऱ्यांची कारखान्याकडे लेखी मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : राजाराम कारखान्यावर २६८ कोटी रुपयांचे कर्ज व देणी आहेत. कारखान्याच्या एकूण मिळकतीपेक्षा हे कर्ज व देणे जादा आहे. असे असताना राजाराम कारखाना विस्तारीकरण व सहवीज निर्मिती प्रकल्प राबवणार आहे. त्यासाठी सुमारे १२५ कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. हा विस्तारीकरणाचा व सहवीज प्रकल्पाचा घाट कोणाच्या हट्टासाठी घातला जात आहे, याचा कारखान्याने वार्षिक सर्वसाधारण सभेत खुलासा करावा. तसेच कारखान्याकडे लेखी स्वरूपात पाठविलेल्या इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत, अशी मागणी नितीन बाळासाहेब पारखे व जयवंत लक्ष्मण पाटील यांच्यासह अन्य बारा सभासदांनी केली आहे.
कारखान्याकडे पाठविलेल्या प्रश्नांची प्रत माहितीसाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांनाही पाठविण्यात आली आहे.
कसबा बावडा (ता. करवीर ) येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २२ ) रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे. या सभेसाठी कसबा बावड्यातील १२ व हातकणंगले तालुक्यातील दोन अशा एकूण चौदा सभासदांनी लेखी प्रश्न कारखान्याला पाठवले असून या प्रश्नांची उत्तरे व माहिती सभेत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या विचारलेल्या प्रश्नांत माल खरेदी ॲडव्हान्स कोणाची आहे, ऑडिट रिपोर्टमधील गंभीर आक्षेपांचे स्पष्टीकरण द्यावे, तोडणी कामगार व कंत्राटदार यांचेकडून किती रक्कम येणे आहे, येणे वसूल भागभांडवलाबाबत खुलासा करावा, उपसा सिंचन योजनेवर कारखान्याने आतापर्यंत किती खर्च केला, हंगामातील साखर शिल्लक ठेवण्याचे प्रयोजन काय, कमी दराने मोलॅसिसची विक्री का केली, आदी प्रश्नांचा समावेश आहे.