उद्योगांकडून विधायक सूचनांची अपेक्षा
By admin | Published: July 23, 2014 11:55 PM2014-07-23T23:55:52+5:302014-07-24T00:07:38+5:30
एन. जे. पवार : शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी साधला उद्योजकांशी संवाद
कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये रोजगारभिमुखता वाढविणे, अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांना उद्योगांकडून विधायक सूचनांची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, बुधवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील इंडस्ट्री इन्स्टिट्यूट सेलमार्फत ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट मीट-२०१४’ या विशेष चर्चासत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील चर्चासत्रास ज्येष्ठ उद्योगपती रामप्रताप झंवर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, एल. कॉम. इंटरनॅशनलचे डॉ. गिरीश वझे, मॅकजय लॅबोरेटरीजचे मोहन मुल्हेरकर, प्रेसिफॅब इंजिनिअर्सचे योगेश कुलकर्णी, सेराफ्लेक्स इंडियाचे विलास जाधव, द्राक्ष उत्पादक सुभाष आरवे, नीना फुडस्चे सुनील काळे, किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे कृष्णा गावडे, रणजित शहा प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांना उद्योगांकडून विधायक सूचनांची अपेक्षा आहे, ज्यामुळे अभ्यासक्रमांमध्ये लवचिकता आणता येईल. त्यासह विद्यार्थ्यांमधील रोजगारभिमुखता वाढविता येईल. गुणांची कमाई करणे सोपे आहे. मात्र, जीवनात यशस्वी होणे सोपे नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याची वृत्ती जोपासावी, तसेच ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि सकारात्मक वृत्ती या घटकांच्या माध्यमातून कार्यरत राहावे. विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना विकसित करण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहावे. निव्वळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अनुभव घेण्यावर भर द्यावा. उद्योगांच्या साहाय्याने विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन झाल्यास या दोन्ही घटकांना ते उपयुक्त ठरणारे आहे.
चर्चासत्राचे उद्घाटन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यानंतर मोहन मुल्हेरकर, गिरीश वझे, विलास जाधव, सुनील काळे, आदींनी मनोगते व्यक्त केली. उद्योग, व्यवसायांमधील संधी, नवीन तंत्रज्ञान याबाबत विद्यार्थ्यांनी प्रमुख उपस्थित उद्योजकांसमवेत संवाद साधला. विद्यापीठाच्या माहिती-तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक डॉ. एम. के. साहू यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
अन्नधान्य प्रक्रिया आणि कृषी उद्योगांसाठी पूरक ठरणारे पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत.
- सुभाष आरवे
विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांनी उद्योगांना भेटी देऊन त्यांच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमांची रचना करावी. संयुक्त स्वरूपातील ‘सँडविच कोर्स’ सुरू व्हावेत.
- रामप्रताप झंवर
उद्योग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी विद्यापीठाकडून संशोधनाच्या माध्यमातून सहकार्य व्हावे.
- आनंद माने
उद्योगाला आवश्यक संशोधन विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांनी करावे.
- योगेश कुलकर्णी