अपेक्षांचा डोंगर... आश्वासनांचे गाजर
By Admin | Published: May 26, 2015 12:15 AM2015-05-26T00:15:23+5:302015-05-26T00:50:19+5:30
शंभर कोटींच्या अपेक्षांचे गाठोडे आदर्श गाव योजनेतून गावातील सर्व समस्या मार्गी लागणार, अशी आशा ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची होती
दत्ता पाटील - तासगाव -सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी तासगाव तालुक्यातील आरवडे गावाची ११ नोव्हेंंबर २०१४ रोजी आदर्श ग्रामसाठी निवड केली. मात्र, सहा महिन्यांच्या कालखंडानंतर ढिम्म प्रशासन, अपेक्षांचा डोंगर आणि आश्वासनांचे गाजर दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया गावातील सामान्य जनतेतून उमटत आहे.वर्षभरात दोन वेळा खासदारांचा दौराआदर्श गाव म्हणून आरवडेची निवड झाली. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित आले. निवड जाहीर करण्यासाठी स्वत: खासदार संजय पाटील अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह गावात दाखल झाले. गावाची निवड झाल्यानंतर योजनेच्या निमित्ताने खासदारांनी केवळ दोनवेळा गावाला भेट दिली. दोन्ही दौऱ्यावेळी जिल्हा पातळीवरील अधिकारीही गावात आले. त्यांनी लोकांच्या समस्या, आणि अपेक्षा जाणून घेतल्या एवढेच.
शंभर कोटींच्या अपेक्षांचे गाठोडे आदर्श गाव योजनेतून गावातील सर्व समस्या मार्गी लागणार, अशी आशा ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची होती. गावाच्या अपेक्षा वाढल्या. जिल्हा स्तरावरील सरकारी अधिकाऱ्यांकडून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले. कारभाऱ्यांचा उत्साह वाढला. वीजपुरवठा, पाणीपुरवठा, शेतीच्या समस्या, शाळांची समस्या अशा एक ना अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गाव सरसावले. एक-एक करत गावाच्या विकासाचा शंभर कोटींचा आराखडा तयार झाला.
डिसेंबर २०१४ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागाकडे मागण्यांच्या आराखड्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले. तेव्हापासून अद्याप गावाचे डोळे लागले आहेत, ते या आराखडा मंजुरीकडे. निधी मंजूर होईल आणि कामे मार्गी लागतील, असा विश्वास असणाऱ्या ग्रामस्थांनी आता वेगळे काहीतरी होईल, अशी अपेक्षाच करणे सोडून दिले आहे.
केवळ एका योजनेला मंजुरी
मात्र, वर्षभराच्या काळात केवळ एकाच योजनेला मंजुरी मिळाली. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एक कोटी ५२ लाखांची पाणीपुरवठा योजनाच काय ती या आदर्श योजनेचे फलित ठरली!
खासदार फंडाची अपेक्षा फोल
गावाची निवड झाल्यानंतर सर्वच योजनांतून तात्काळ निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षा असलेल्या जिल्हा नियोजन समितीतून आतापर्यंत एकही रुपयाचा निधी मिळाला नाही. एवढेच नव्हे तर खासदारांनी स्वत: गावाची निवड केली, योजनाही खासदारांसाठी असल्यामुळे खासदार फंड मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गावाची ही अपेक्षाही फोल ठरली.
ग्रामपंचायतीने गावच्या विकासाचा आराखडा तयार करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा आम्ही करीत आहोत. आजपर्यंत शासकीय यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यापुढे सर्व प्रस्ताव तत्काळ मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.
- गंगुताई मोरे, सरपंच,
ग्रामपंचायत, आरवडे
संजय पाटील--आरवडे