सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीतून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:28 AM2021-09-24T04:28:58+5:302021-09-24T04:28:58+5:30

कोल्हापूर : महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय वॉर्डरचनेनुसार होणार असून, या निवडणुकीतून सर्वसामान्य कार्यकर्ते हद्दपार होण्याचा दावा काही जाणकारांकडून केला ...

Expelled from the general worker election | सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीतून हद्दपार

सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीतून हद्दपार

Next

कोल्हापूर : महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय वॉर्डरचनेनुसार होणार असून, या निवडणुकीतून सर्वसामान्य कार्यकर्ते हद्दपार होण्याचा दावा काही जाणकारांकडून केला जात आहे. राजकीय पक्षात तिसऱ्या, चौथ्या फळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक लढविण्याची अपेक्षा असते. परंतु वाॅर्डाचे कार्यक्षेत्र तसेच मतदार संख्या मोठी होणार असल्यामुळे अशा कार्यकर्त्यांना निवडणूक लढविणे अशक्य होणार आहे.

कोणतीही निवडणूक असली की त्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांना राजकीय पक्षाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. महानगरपालिका निवडणूक त्याला अपवाद ठरलेली नाही. एका प्रभागातून निवडून येण्यासाठी उमेदवारांना दहा-वीस लाख रुपये खर्च करावे लागतात. एखाद्या ठिकाणी काटाजोड लढत असली, तर तीस-चाळीस लाखांपर्यंत हा खर्च वाढतो. त्यामुळे राजकीय पक्षाचे नेते मुलाखतीवेळी ‘निवडणुकीत तुम्ही किती खर्च करू शकता’ असा पहिला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे गेल्या तीन-चार निवडणुकीतून सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी अपक्ष म्हणून उभे राहात होते. पण आता तेही कायमचे बंद होणार आहे.

सर्वसामान्य कार्यकर्ता प्रभागात काम करीत असतो, लोकांच्या अडीअडचणीवेळी उपयोगी पडत असतो, पक्षाच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांचा थेट संपर्क मतदारांपर्यंत असतो. परंतु निवडणुकीसाठी होणारा खर्च त्याला परवडणारा नसतो. त्यामुळे आपली हौस भागविण्यासाठी म्हणून का होईना निवडणूक लढवायचा प्रयत्न करायचा. मात्र पैशाने मजबूत असणाऱ्या उमेदवारापुढे त्यांचा टिकाव लागत नाही.

- शहराच्या विकासाला बसणार खीळ -

निवडणुकीनंतर काही प्रश्न निर्माण होणार आहेत. एखाद्या वॉर्डातून तीन उमेदवार तीन पक्षाचे निवडून आले, तर विकास कामांना निधी कोणी, कसा द्यायचा, विकासाची कामे कोणत्या गल्लीत करायची, कोणती कामे बजेटमध्ये धरायची, याबाबतही नगरसेवकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉर्डातील विकास कामांना खीळ बसू शकते.

- राजकीय अपेक्षांवरही पाणी-

कोट १.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होणार आहे. जो पैशाने भक्कम आहे तोच विजयापर्यंत जाईल आणि पैसा नाही, पण प्रामाणिक कार्यकर्ता आहे, तो मात्र मागे पडणार आहे. जनतेपर्यंत पोहोचणे आणि जनतेने अशा उमेदवारांना स्वीकारणे या गोष्टी ‘जरतर’ च्या आहेत.

दत्ताजी टिपुगडे.

कोट २.

समाजाशी सतत संपर्कात, ज्यांचे काम चांगले आहे, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाचे जर पाठबळ मिळाले तरच ते निवडून येतील. राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही आता अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिकिटे दिली पाहिजेत.

अनिल कदम.

कोट ३.

निवडणुकीच्या राजकारणात ज्याची आर्थिक परिस्थिती नाही, असा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीच मेला आहे. पैशावर राजकारण चालले आहे. त्यामुळे यापुढे ज्याच्याकडे पैसा अधिक त्यालाच उमेदवारी मिळेल. सामान्य कार्यकर्त्यांनी आता घरात बसायचे.

पांडुरंग आडसुळे.

कोट ४.

निवडणुकीत पैशाचा वापर होतो, हे आता लपून राहिलेले नाही. पुढील निवडणुकीत सामान्य कार्यकर्ता कसा टिकून राहतो, हे सांगणे अवघड आहे; पण पक्षांनी आता आपल्या कार्यकर्त्यांना मोठे केले पाहिजे.

रमेश पुरेकर.

Web Title: Expelled from the general worker election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.