पंचगंगेच्या रूकडी बंधाऱ्यावर मृत माशांचा खच, नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 05:42 PM2022-02-26T17:42:23+5:302022-02-26T17:55:21+5:30
गेल्या काही दिवसापुर्वी कसबा बाबडा, शिये, शिंगणापूर परिसरात देखील अशाच प्रकारे मासे मृत पडले होते.
रुकडी/माणगांव: रूकडी ता. हातकणंगले येथील पंचगंगा नदी काठावर मृत माशांचा खच पडल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापुर्वी कसबा बाबडा, शिये, शिंगणापूर परिसरात देखील अशाच प्रकारे मासे मृत पडले होते. पंचगंगेतील दुषित पाण्यामुळे हे मासे मृत होत असल्याने ग्रामस्थांमधून नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे.
शहरातील प्रदूषणाचा फटका नदीला बसत असून मृत माशांचा खच रूकडी येथील बंधारा ठिकाणी येवून साचला आहे. या बंधारा नजीक रूकडी गावास पाणी पुरवठा करणारे जॅकवेल असून या जॅकवेल मध्ये मृत मासे अडकले आहेत. यामुळे जॅकवेल मधून पाणीपुरवठा करणे अडचणीचे झाले असून गावात दुर्गंधी युक्त पाणी येत आहे.
दरम्यान, मृत मासे बंधारा येथे येवून अडकल्याची बातमी गावात कळताच नागरिकांनी मासे नेण्यास नदीकाठी गर्दी केली. काही हुल्लडबाज युवकांनी बॅटरीच्या साहाय्याने नदीपाञात उतरून मासे पोते भरून नेले असून विक्रेते ही राञभर नदीतील मासे गोळा करत होते.
नदीपरिसरात दुर्गंधी पसरली असून नदीतील पाणी पिण्यासाठी कसे वापरायचे असा संतप्त सवाल नदीकाठचे नागरिक करत आहेत. नदी पात्रात दुषित पाणी सोडणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.
वळीवडे व सुर्वे बंधाऱ्याजवळही माशांचा खच
वळीवडे येथील स्वामी शांतीप्रकाश घाटाच्या पुर्वे व पश्चिमे कडुन मुडशिंगी, वळिवडे व गांधीनगरचे हजारे लिटर सांडपाणी पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याने नदीतील लाखो मासे म्रुत होऊन वळीवडे व येथील सुर्वे बंधार्याजवळ मृत माशांचा खच १/२ किलोमीटर लांब पात्र होउन नदीचे पाणी दिसेनासे झाले.
पर्यावरण प्रेमींनी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निलेश मरभळ यांना या दोन्ही ठिकाणी नेऊन दुषीत पाण्याचे, मृत माशांचे नुमने पंचनामाकरुन ताब्यात घेण्यास भाग पाडले. येवढ्या प्रमाणात मासे मरण्याची ही पहालीच घटना असल्याने लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने व प्रदुषण नियंत्रणातील वरीष्ठ अधिकाऱ्यां ही घटना गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. अॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई व सागर तामगावे ह्यानी हा प्रकार उघडकीस आणला.