Kolhapur: अंबाबाई मूर्तीबाबत तज्ज्ञांचा अहवाल आज होणार सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 05:35 PM2024-04-04T17:35:14+5:302024-04-04T17:35:35+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती संदर्भात आज गुरुवारी सुनावणी होणार आहे. यावेळी पुरातत्व खात्याच्या तज्ज्ञांचा मूर्तीची स्थिती ...
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती संदर्भात आज गुरुवारी सुनावणी होणार आहे. यावेळी पुरातत्व खात्याच्या तज्ज्ञांचा मूर्तीची स्थिती व उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर होणार असून त्यानंतर होणाऱ्या पुढील सुनावणीत अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज होत असून ही झीज रोखण्यात रासायनिक संवर्धन देखील कमी पडले आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्तीची पाहणी करून सद्य स्थितीचा अहवाल देण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली जावी अशी याचिका दिवाणी न्यायालयात केली होती.
यावर सुनावणी होऊन पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगिराज व आर. एस. त्र्यंबके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १४ व १५ मार्च रोजी मूर्तीची पाहणी केली. त्यांचा अहवाल तयार झाला असून तो त्यांनी सोमवारी पोस्टाने न्यायालयाला पाठवला आहे. त्यामुळे अहवाल आज गुरुवारी न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे.
अहवाल सादर झाल्यानंतर तो वादी-प्रतिवादींना दिला जाईल. त्यानंतर पुढील सुनावणीत अहवालावर चर्चा होईल. तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार मूर्तीचे जतन संवर्धन केले जाईल.