नेज येथे दुरंगी लढत स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:12+5:302021-01-02T04:20:12+5:30
कुंभोज : नेज (ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक ...
कुंभोज : नेज (ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अकरा जागांसाठी तब्बल ४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, आज छाननीअंती सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. येथे स्थानिक गटांचे प्राबल्य तसेच शह-काटशहच्या राजकारणामुळे पक्षीय आघाड्या विस्कटलेल्या असून, काॅंग्रेससोबत भाजप, तर शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना तटस्थ दिसून येत आहे.
येथील चार प्रभागांतील अकरा जागांसाठी निवडणूक होत असून, बिनविरोधसाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना पक्षीय लेबल घेऊन स्थानिक गट निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. नेज व शिवपुरीत ३८०० मतदार आहेत.
येथे गतवेळच्या ग्रामपंचायतीच्या लढतीतील भाजपचे बी. एस. गारे, शिवसेनेचे बी. एल. शिंगे हे काॅंग्रेसचे रवींद्र खोत, माजी पं. स. सदस्य बी .जे. पाटील, माजी सरपंच सुनील देशमुख हे पारंपरिक प्रतिस्पर्धी होत. तथापी बदललेल्या पक्षीय आघाडींनुसार बी.एस. गारे शिवसेनेची साथ सोडून काॅंग्रेस आघाडीसोबत राहिले आहेत. बी. जे. पाटील व बी. एस. गारे एकत्र आल्याने स्थानिक गट विस्कटले आहेत. स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब एडके यांची मात्र या निवडणुकीत गोची झाली आहे. शिवपुरीत शिवसेनेने उमेदवार न दिल्याने येथील तीन अपक्षांची स्वतंत्र आघाडी होणार आहे. त्यास स्वाभिमानीचे बळ मिळण्याची शक्यता आहे. गतवेळच्या निवडणुकीत सरपंचपदाच्या दावेदार असणाऱ्या स्वाभिमानीच्या महिला उमेदवाराचा निसटता पराभव झाल्याचे शल्य राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या निवडणुकीत तटस्थपणाची भूमिका बजाविण्याचा निर्णय घेतला आहे.
चौकट- निवडणूक ग्रामपंचायतीची .....किंमत एका मताची..!
तंटामुक्त अभियानात राज्यस्तरीय बक्षीस पात्र नेज गावची प्रत्येक निवडणूक अटीतटीची होते. २०१० च्या निवडणुकीत तर एका मताधिक्याच्या जोरावर एक जागा अधिक जिंकून ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवले होते. त्यापासून इथल्या गटनेत्यांपासून कार्यकर्ते , उमेदवार तसेच मतदारांनाही एका मताची किंमत काय असते, याची चर्चा दहा वर्षांनंतरही निवडणुकीच्या निमित्ताने गावात होत आहे.