कळसकरच्या कोल्हापूर कनेक्शनचा होणार उलगडा -: ‘एसआयटी’कडून माहिती काढण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:46 AM2019-06-14T00:46:51+5:302019-06-14T00:47:22+5:30

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, जि. औरंगाबाद) याच्या कोल्हापूर कनेक्शनचा उलगडा करण्यासाठी

Explanation of Kollhpora Kolhapur connection: - SIT seeks to remove information | कळसकरच्या कोल्हापूर कनेक्शनचा होणार उलगडा -: ‘एसआयटी’कडून माहिती काढण्यासाठी प्रयत्न

कळसकरच्या कोल्हापूर कनेक्शनचा होणार उलगडा -: ‘एसआयटी’कडून माहिती काढण्यासाठी प्रयत्न

Next
ठळक मुद्देगोविंद पानसरे हत्या प्रकरण ; त्याच्याशी संबंधितांची चौकशी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, जि. औरंगाबाद) याच्या कोल्हापूर कनेक्शनचा उलगडा करण्यासाठी ‘एसआयटी’कडून प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी दिवसभर त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. पानसरे यांच्या हत्येपूर्वी म्हणजेच पाच वर्षापूर्वी त्याचे कोल्हापुरातील वास्तव्याबाबत माहिती एकत्रीकरणाचे काम सुरू आहे.

पानसरे हत्येप्रकरणी शरद कळसकर या सातव्या संशयित आरोपीस राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यातून ‘एसआयटी’ने अटक केली आहे. त्यानंतर त्याला बेळगावसह परिसरात फिरवून चौकशी केल्यानंतर गुरुवारी त्याच्या कोल्हापुरातील कनेक्शनचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘एसआयटी’च्या पथकाने केला. पानसरे यांच्या हत्येपूर्वी म्हणजेच पाच वर्षांपूर्वी शरद कळसकर हा उद्यमनगरात एका कारखान्यात लेथ मशीन चालविण्याचे प्रशिक्षण घेत होता, अशी माहिती पोलिसांसमोर आली, त्या दिशेने पथकाने तपास सुरू केला आहे.

प्रत्यक्षात त्याचे काही कट्टर धार्मिक संस्थांशी संबंध होते. त्याचे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर मित्र होते. शिवाजी उद्यमनगरातील कोणत्या कारखान्यात त्याने नोकरी केली? त्याला खरेच नोकरीची गरज होती का? त्या नोकरीदरम्यान तो कोठे, कोणाकडे राहत होता? त्याचे मित्र कोण? याचे गूढ उकलण्याचे काम ‘एसआयटी’मार्फत सुरू झाले आहे.
त्याबाबत गुरुवारी दिवसभर शरद कळसकर याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांनी उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पानसरे यांची हत्या होण्यापूर्वी तो आठवडाभर कोल्हापुरात राहिला होता. त्यामुळे त्याच्याकडून उघडकीस येणाऱ्या माहितीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

शरद कळसकरकडून रेकीचा संशय
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी शरद कळसकर हा कोल्हापुरात आठवडाभर वास्तव्यास होता. त्यावरून त्याने पानसरे यांची रेकी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यांच्या हत्येचा कट रचणारे संशयित कळसकरला कोल्हापुरात भेटले असल्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने कोल्हापुरातील त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचीही चौकशी सुरू केली जात आहे.

यामध्ये काही धार्मिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तपासाबाबत ‘एसआयटी’कडून कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. संशयित कळसकरवर ‘एसआयटी’चे पथक दिवस-रात्र प्रश्नांचा भडिमार करून चौकशी करीत आहे.तपास अधिकारी तिरूपती काकडे, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या पथकाकडून कळसकर याची चौकशी सुरू आहे.

Web Title: Explanation of Kollhpora Kolhapur connection: - SIT seeks to remove information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.