आमदारांच्या अंगरक्षकाच्या घरातील चोरीचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:21 AM2019-07-24T11:21:19+5:302019-07-24T11:23:32+5:30
आमदारांकडे अंगरक्षक म्हणून नेमणुकीस असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून सर्व्हिस पिस्टल, जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याचा थरारक पाठलाग करून लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिताफीने पकडले.
कोल्हापूर : आमदारांकडे अंगरक्षक म्हणून नेमणुकीस असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून सर्व्हिस पिस्टल, जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याचा थरारक पाठलाग करून लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिताफीने पकडले.
संशयित राजू तुकाराम सुतार (वय २८, रा. कारंडे गल्ली, लक्षतीर्थ वसाहत, मूळ रा. वैभववाडी, ता. सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १0 घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले असून, सर्व्हिस पिस्टल, २८ जिवंत राऊंड, २६ तोळे सोन्याचे दागिने, पाच मोबाईल, चांदीचा हार, लोखंडी कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, कात्री आणि कटर असा सुमारे १० लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित चोरट्याकडून जप्त केलेला मुद्देमाल.
पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत मोरे रायगड येथे कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्या रंकाळा बसस्थानक परिसरातील घरातून चोरट्याने सोन्याचे दागिने व ३० हजार रुपयांची रोकड आणि सर्व्हिस पिस्टल, जिवंत काडतुसे असा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले होते. सर्व्हिस पिस्टल चोरीस गेल्याने पोलीस कसोशीने चोरट्याचा शोध घेत होते.
लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, आदी तीन पथकांद्वारे चोरट्यांचा शोध सुरू होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत होते. गेली दोन महिने एकही धागादोरा पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. ही घरफोडी पोलिसांसाठी चॅलेंजिंग होती.
लक्ष्मीपुरीचे कॉन्स्टेबल निवास पाटील व रोहीत मर्दाने यांना घरफोडी चोरट्याची माहिती मिळाली. त्यांनी निरीक्षक वसंत बाबर यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार गेले १५ दिवस या दोघांसह सुनीता शेळके, नामदेव पाटील असे चौघेजण संशयिताच्या पाळतीवर होते.
उत्तरेश्वर पेठेतून लक्षतीर्थ वसाहतीकडे जात असताना संशयीत सुतार दिसून आला. त्याचा पाठलाग केला असता, तो जुना शिंगणापूर नाका येथील स्वरूपानंद महाराज मंदिरासमोर रस्त्यावर आपले हातात पिशवी घेऊन चालत जात होता. पोलीस आपले मागावर आहेत, याची चाहुल लागताच तो लपण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला पकडण्यासाठी पोलीस पुढे सरसावले असता, तो पळून जाऊ लागला.
यावेळी निवास पाटील व रोहीम मर्दाने यांनी झडप टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. हातातील पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये घरफोडीचे साहित्य मिळून आले. तो राहत असलेल्या कारंडे गल्लीतील घराची झडती घेतली असता, त्या ठिकाणी रंकाळा बसस्थानक परिसरातील घरफोडीचा मुद्देमाल मिळून आला.
संशयिताची पार्श्वभूमी
तब्बेतीने एकदम बारीक असलेला संशयित राजू सुतार हा वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवाशी आहे. त्यास लहानपणापासूनच चोरीची सवय आहे. अल्पवयीन असताना त्याने गगनबावडा, विश्रामबाग, कुपवाड, रायगड, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शिरोली एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याला विश्रामबाग येथील गुन्ह्यामध्ये दोन वर्षांची शिक्षा झाल्याने तो शिक्षा भोगून कळंबा जेलमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने घरफोड्या करण्यास सुरुवात केली.
या घरफोड्यांची दिली कबुली
कोल्हापुरातील धोत्री गल्ली, शुक्रवार पेठ, केएमसी कॉलेज, दुधाळी, पिवळा वाडा, लक्षतीर्थ वसाहत येथील घरफोड्यांची कबुली दिली आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. करवीर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये आर. के. नगर, कळंबा, जिवबा नाना जाधव पार्क अशा १0 घरफोड्या केल्याची कबुली दिली.