मटका रॅकेटचा पर्दाफाश; प्रेरणा कट्टे यांच्या पथकाला एक लाखाचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:36 PM2019-10-06T23:36:56+5:302019-10-06T23:37:01+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या चार राज्यांतील मटका बेटिंगचे रॅकेट उघडकीस आणून त्यामागील सूत्रधारांवर मोक्काअंतर्गत कारवाई ...
कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या चार राज्यांतील मटका बेटिंगचे रॅकेट उघडकीस आणून त्यामागील सूत्रधारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करून सर्वोत्कृष्ट तपास केल्याप्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व त्यांच्या पथकाला पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
कोल्हापुरात काही महिन्यापूर्वी मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम मुल्ला, त्याची पत्नी शमा, भाऊ फिरोज, राजू, जावेद यांच्यासह सम्राट कोराणे, जयेश शहा, शैलेश मणियार, जितेंद्र गोसालिया, जयेश हिरजीसावला, राजेंद्र धरमसी, मनीष अग्रवाल, प्रकाश सावला अशा ४४ जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून संघटित गुन्हेगारीच्या कलमाखाली ‘मोक्का’ कारवाई केली. महाराष्टÑ, कर्नाटक, गोवा, गुजरात, आदी राज्यांतील मटक्याचे जाळे उखडून टाकण्यात पोलिसांना यश आले. तसेच त्यामागील सूत्रधारांनाही अटक केली. या टोळीविरोधात भक्कम पुरावे गोळा करून १२०० पानी दोषारोपपत्र पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात दाखल केले. मटका व्यवसायाविरोधातील देशातील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली. त्यामुळे मुंबई मटका दीर्घकाळ बंद राहिला. या कौशल्यपूर्ण तपासाची दखल घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी कट्टे व त्यांच्या पथकाला बक्षीस जाहीर केले.
तपास पथक : शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्यासह सचिन पाटील, नंदकुमार देसाई, सोमनाथ पानारी, अभिजित पाटील, वासुदेव यांचा समावेश आहे.