आईबाबत व्यक्त केली कृतज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:25 AM2021-05-10T04:25:07+5:302021-05-10T04:25:07+5:30
मातृत्वाप्रती, मातेप्रती आदरभावना दर्शविण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी ‘जागतिक मातृदिन’ साजरा करण्यात येतो. आपल्या घरी असणाऱ्यांनी रविवारी आईला नमस्कार करून ...
मातृत्वाप्रती, मातेप्रती आदरभावना दर्शविण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी ‘जागतिक मातृदिन’ साजरा करण्यात येतो. आपल्या घरी असणाऱ्यांनी रविवारी आईला नमस्कार करून दिवसाची सुरुवात केली. काही कुटुंबांमध्ये आईला ओवाळण्यात आले. तिच्या हस्ते केक कापण्यात आला. तिला भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन तिच्याबद्दल आदरभावना व्यक्त केली. घरातच मर्यादित लोकांमध्ये छोटेखानी पार्टी करीत आनंद व्यक्त केला. ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!’, ‘आपण तर आज करतोय वर्क फ्रॉम होम; जी रोज हे काम निमूटपणे करतेय ‘ती आई’, ‘कोठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आई’, असे विविध संदेश सोशल मीडियावर दिवसभर शेअर करीत अनेकांनी आईबाबत कृतज्ञता व्यक्त केली. या संदेशांसह आईसोबतची आपली छायाचित्रे बहुतांश जणांनी त्यांच्या व्हॉटस्ॲॅप, फेसबुकच्या डीपीवर लावली होती. काहींनी ती इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर शेअर केली होती. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मातृदिन हा साध्या पद्धतीने साजरा झाला. संचारबंदीमुळे ज्यांना आईला भेटता आले नाही, अशा मुला-मुलींनी दूरध्वनी आणि व्हिडिओ कॉल करून आईला शुभेच्छा देत तिचा आशीर्वाद घेतला.