जयसिंगपुरात सुविधांची एक्स्प्रेस रखडली
By admin | Published: May 15, 2015 09:40 PM2015-05-15T21:40:56+5:302015-05-15T23:39:05+5:30
आदर्श रेल्वेस्थानक कागदावरच : प्रशासकीय काम रेंगाळले, ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ म्हणीप्रमाणे कारभार
संदीप बावचे - जयसिंगपूर -आदर्श रेल्वेस्थानक म्हणून जयसिंगपूर रेल्वेस्थानक कागदावरच राहिले
आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार ही अपेक्षाच राहिल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय काम रेंगाळल्यामुळे येथील रेल्वेस्थानकाचा कायापालट होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
लोकप्रतिनिधींकडून सोयीसुविधा बाबत पाठपुरावा केला जातो. मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे जयसिंगपूर रेल्वेस्थानकात सुविधा मिळण्यास अडचणी ठरत असल्याने सुविधांची एक्स्प्रेस केव्हा धावणार? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
नोकरी, कामानिमित्ताने शेकडो प्रवासी दररोज जयसिंगपूर रेल्वेस्थानकावरून प्रवास करतात. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे नाते रेल्वेस्थानकाशी अगदी घट्ट झाले आहे. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबत असल्यामुळे प्रवास सोयीस्कर ठरत आहे. गेल्या चार-पाच वर्षांच्या कालावधीत थोडाफार या ठिकाणी विकासात्मक बदल झाल्यामुळे प्लॅटफार्म, ओव्हरब्रीज, तिकीट व्यवस्था, अशी सुविधा सुरू झाली. मात्र, शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील प्रवाशांची नाळ जोडणाऱ्या या स्थानकात भरीव सुविधा नसल्यामुळे केवळ थांब्याचेच ठिकाण म्हणून या स्थानकाकडे पाहिले जात असताना रेल्वे मंत्रालयाने आदर्श स्थानक योजनेमध्ये जयसिंगपूर रेल्वेस्थानकाचा समावेश केला. डिसेंबर २०१४ मध्ये ही घोषणा करण्यात आली.
या योजनेत येथील रेल्वेस्थानकाचा समावेश झाल्यामुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार ही अपेक्षा होती. शिवाय या स्थानकावर बहुतेक
सुविधा नसल्यामुळे आजपर्यंत विकासात्मक दृष्टिकोन दिसून आला नव्हता. खासदार राजू शेट्टी
यांनी जयसिंगपूर रेल्वेस्थानकावरील सोयी-सुविधेसाठी विशेष प्रयत्न
करून आदर्श स्थानक योजनेमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
एकीकडे लोकप्रतिनिधींनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पाठपुरावा करायचा, तर दुसरीकडे प्रशासनातील ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ या म्हणीप्रमाणे कारभार करायचा, अशी वस्तुस्थिती बनली आहे. यामुळे जयसिंगपुरातील सुविधांची एक्स्प्रेस केव्हा धावणार, असाच प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
आदर्श रेल्वेस्थानक योजनेंतर्गत स्थानकाचे सौंदर्यकरण, वॉटर कुलर, अत्याधुनिक सिग्नल व्यवस्था, प्रतीक्षालय, अंघोळीच्या सुविधेसह विश्रांतीगृह, आवश्यक प्रकाशयोजना, संगणकावर आधारित ग्राहक सूचना, पादचाऱ्यांसाठी ओव्हर ब्रिज, एटीएम सुविधा, स्वच्छतागृह, प्लॅटफार्म दुरुस्ती, बुक स्टॉल अशा सुविधांचा समावेश आहे.
ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानक
स्वातंत्र्यपूर्व काळापासून जयसिंगपूर येथे रेल्वेस्थानकाची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे या स्थानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
शिरोळला कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. या भागातील भाजीपाला मुंबईसह अन्य मोठ्या बाजारपेठेत पाठविला जातो.