स्थायी समिती सभेतून आरोग्य अधिकाऱ्यांची हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 06:12 PM2020-08-10T18:12:59+5:302020-08-10T18:28:49+5:30
कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांची सोमवारी स्थायी समिती सभेतून हकालपट्टी करण्यात आली. शहरातील कोरोनामुळे उपचारांविना अनेकांचा मृत्यू होत आहे.
कोल्हापूर : महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांची सोमवारी स्थायी समिती सभेतून हकालपट्टी करण्यात आली. शहरातील कोरोनामुळे उपचारांविना अनेकांचा मृत्यू होत आहे.
प्रशासन म्हणून खासगी रुग्णालयांवर वचक ठेवला गेला नाही. नागरिकांसमोर कोरोना उपचाराबाबत जनजागृती करण्यात प्रशासन कमी पडले, असे आरोप स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली.
मला कामाची गरज नाही. माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी महापालिकेत आतापर्यंत थांबलो आहे, ही माहिती वॉररूममध्ये मिळेल, अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे सर्व सदस्य आक्रमक झाले.
स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी सर्व सदस्यांनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित केले.
नागरिक व्हेंटिलेटर असणाऱ्या हॉस्पिटलमध्येच जाण्यासाठी धावाधाव करतात. त्यामध्ये त्यांचा बराच वेळ जातो. काही लोकांना यामुळे प्राण गमवावे लागले. यासंदर्भात आरोग्य विभाग म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही. नागरिकांना कोरोना संदर्भातील जनजागृती करणे गरजेचे आहे, असे गटनेते शारंग देशमुख यांनी सांगितले.
यावर आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही. मला कामाची गरज नाही, असे शब्द वापरले. यावर गटनेते देशमुख, सदस्य अजित राऊत, नियाज खान यांनी डॉ. पाटील यांची चांगलीच खरडपट्टी केली.
तुम्ही स्थायी समिती सभागृहाचा अपमान केला आहे. सभागृहात थांबू नका बाहेर व्हा, अशा शब्दांत सुनावले. आक्रमक झालेल्या सदस्यांनी त्यांना सभागृहातून बाहेर काढले. डॉ. पाटील गेल्या काही दिवसांपासून राजीनाम्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. याचबरोबर त्यांची आरोग्य अधिकारी पदाची वर्षाची मुदतही संपण्याच्या मार्गावर आहे. यादरम्यानच असा प्रकार घडला.