कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा
By Admin | Published: September 12, 2015 12:39 AM2015-09-12T00:39:33+5:302015-09-12T00:50:30+5:30
तुकाराम मोरे : चारा, पीक वाचविण्यासाठी पंचसूत्री; जीवनमान उंचावण्यासाठी ‘गाव दत्तक योजना’
कोल्हापूर : कृषी विद्यापीठाने तयार केलेले प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्यावतीने शुक्रवारी कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात रब्बी व उन्हाळी हंगाम २०१५-१६ याकरिता आयोजित केलेल्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
डॉ. मोरे म्हणाले, शेतकऱ्यांची गरज, बदललेली पीक परिस्थिती, जमीन, हवामान, नैसर्गिक परिस्थिती आदी गोष्टी विचारात घेऊन भविष्यात कृषी संशोधन करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट करून मोरे म्हणाले, कमीत कमी पाण्यावर अधिक उत्पादकता देणाऱ्या वाणाची निर्मिती करण्याच्या संशोधनावर विद्यापीठाने भर दिला असून, आगामी रब्बी तसेच खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे, निर्मितीच्या दृष्टीने विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाने २ हजार एकरांवर खरीप बियाणे उत्पादन कार्यक्रम हाती घेतला असून, रब्बीच्या हंगामासाठी लागणारे बियाणे उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा ठिबक सिंचनासारख्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनाचा अवलंब करून पीक उत्पादकता वाढवावी. विद्यापीठाच्यावतीने २५१ विविध जातींचे वाण विकसित करण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे आणि शेती संपन्न करावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख उपस्थित म्हणून बोलताना कृषी संचालक डॉ. कृष्णराव देशमुख म्हणाले, जमीन, हवामान, पाणी, स्थानिक परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून कृषी विद्यापीठामार्फत होणारे कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात कृषी अधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे. कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. नागनाथ पाटील यांनी स्वागत केले. डॉ. किरण कोकाटे यांनी प्रास्ताविक, तर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन खोत यांनी आभार मानले.
या बैठकीस महात्मा फुले कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तुषार पवार, राजेश पाटील, एल. आर. पाटील, विभागीय कृषी सहसंचालक नारायण शिसोदे, विजय इंगळे ,डॉ. कैलास मोते, कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे, सांगलीचे उमेश पाटील, अहमदनगरचे अंकुश माने, साताऱ्याचे जे. पी. शिंदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांच्यासह सर्व अधिकारी आणि संशोधक उपस्थित होते.
दहा जिल्ह्यांतील गावे दत्तक
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १० जिल्ह्यांतील ५१ गावे दत्तक घेतली असून, या गावांमध्ये पीक पद्धती, शेतीवरील उद्योग, विद्यापीठाचे तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वांची स्थानिक परिस्थितीशी सांगड घालून शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शनाद्वारे त्यांचे जीवनमान उंचावण्याची नवी संकल्पना राबविली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ऊस, भाजीपाला, रब्बी ज्वारी, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय यांचा समावेश करून विद्यापीठाने अशी गावे दत्तक घेण्याच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास त्याचा सकारात्मक विचार करून या परिसरातील गावे दत्तक घेत तेथील जनतेचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.
पिके वाचविण्यासाठी
पंचसूत्री कार्यक्रम
अपुऱ्या अनियमित पावसामुळे राज्यात टंचाईची परिस्थिती गंभीर असून, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनीच सक्रिय होणे गरजेचे आहे. उपलब्ध पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा अवलंब करणे करजेचे आहे.
खरीप पिके वाचविण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्नही प्रश्न सोडविण्यासाठी चारा निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. विद्यापीठाने कमी पाण्यावर येणारी हरभरा, ज्वारी, करडई, गहू अशा पिकांसाठी पंचसूत्री कार्यक्रम निश्चित करून हा कार्यक्रम गतिमान केला जाणार आहे.