बँक खात्याच्या ‘आधार जोडणी’ला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 06:22 PM2017-05-08T18:22:49+5:302017-05-08T18:22:49+5:30
३१ मेपर्यंत मुदत ; ‘एसएलबीसी’कडून सूचना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0८ : कॅशलेस आणि डिजिटल व्यवहारांचे प्रमाण आणि गती वाढावी, या उद्देशाने केंद्र सरकारने बँक खात्याला आधारकार्डची जोडणी (लिकिंग) सक्ती केली आहे. या जोडणीसाठी दि. ३१ मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. स्टेट लेव्ह बँकर्स कमिटीने (एसएलबीसी) याबाबतच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. अनुदानित सिलिंडर, रोजगार हमी योजनेसह बँक खाते उघडण्यासाठी आधारकार्ड जोडणे केंद्र सरकारने सक्तीचे केले आहे.
आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहावी, कॅशलेस, डिजिटल व्यवहारांची गती वाढविण्यासाठी बँक खात्यांना आधारकार्डची जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे. आधारकार्डची जोडणी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत होती. मात्र, सध्या संबंधित जोडणीची मुदत ३१ मेपर्यंत वाढविली आहे. याबाबतची सूचना ‘एसएलबीसी’ ने जिल्हा अग्रणी बँक आणि विविध बँकांच्या मुख्य कार्यालयांना ई-मेलद्वारे दिल्या आहेत.
या बँकांनी आपल्या अंतर्गत असलेल्या इतर बँका, शाखांना मुदतवाढीची माहिती दिली आहे शिवाय या मुदतीमध्ये आधार जोडणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कळविले आहे. या सूचनांनुसार बँकांची कार्यवाही सुरू आहे. पहिल्या टप्प्यात बँकांनी जनधनअंतर्गत सुरू केलेल्या खात्यांच्या जोडणीला प्राधान्य दिले आहे. बँकांनी विद्यार्थी, शेतकरी अशा विविध घटकनिहाय आधार जोडणीचे काम हाती घेतले आहे.
‘आधार’सह मोबाईल लिकिंग करावे
कॅशलेस आणि डिजिटल व्यवहार करण्यासाठी बँक खात्याला आधारकार्डचे लिकिंग असणे आवश्यक आहे. त्यातून या व्यवहारांची गती वाढणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आर. व्ही. बार्शीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, नागरिकांनी आपल्या बँक खात्याला आधारकार्ड आणि मोबाईल लिकिंग करावे. लिकिंगबाबतची माहिती बँकेतून घेऊन पुढील कार्यवाही करावी.