शिवाजी विद्यापीठाकडून परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 07:22 PM2021-12-08T19:22:01+5:302021-12-08T19:23:01+5:30
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे काही विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हिवाळी सत्रातील परीक्षांचे अर्ज भरण्यास दि. १४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर अधिविभागामध्ये अर्ज भरावयाचे आहेत.
कला, वाणिज्य, विज्ञान, सर्व पदविका, प्रमाणपत्र, बी. व्होक आणि इतर सर्व पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज महाविद्यालय अथवा पदव्युत्तर अधिविभागामध्ये भरण्याची अंतिम मुदत दि. ७ डिसेंबरपर्यंत होती. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे काही विद्यार्थ्यांना या मुदतीमध्ये अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे.
महाविद्यालयांनी विद्यापीठामध्ये परीक्षा अर्जाच्या याद्या दि. १६ डिसेंबरपर्यंत सादर करावयाच्या आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक निवास माने यांनी बुधवारी दिली.