हिवाळी सत्रातील बी.ए., बी.कॉम.च्या अंतिम वर्षातील परीक्षा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:22 AM2021-03-22T04:22:27+5:302021-03-22T04:22:27+5:30

कोल्हापूर : विषयाच्या सांकेतिक क्रमांकातील (सब्जेक्ट कोड) फरकाची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शिवाजी विद्यापीठाने हिवाळी सत्रातील बी.ए., बी.कॉम., बी. ...

On extension of final year examination of BA, B.Com in winter session | हिवाळी सत्रातील बी.ए., बी.कॉम.च्या अंतिम वर्षातील परीक्षा लांबणीवर

हिवाळी सत्रातील बी.ए., बी.कॉम.च्या अंतिम वर्षातील परीक्षा लांबणीवर

Next

कोल्हापूर : विषयाच्या सांकेतिक क्रमांकातील (सब्जेक्ट कोड) फरकाची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शिवाजी विद्यापीठाने हिवाळी सत्रातील बी.ए., बी.कॉम., बी. एस्सी.सह पाच अभ्यासक्रमांच्या (नियमित अथवा सीबीसीएस) अंतिम वर्षाच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ४५ हजार इतकी आहे. या परीक्षेचे वेळापत्रक यथावकाश विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. या सत्रातील बी.कॉम. आयटी, बँक मॅनेजमेंट, आदी विविध २५ विषयांच्या परीक्षा आज, सोमवारपासून होणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मेघा गुळवणी यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि. २२ मार्चपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने हिवाळी सत्रातील परीक्षा घेण्याचे वेळापत्रक विद्यापीठाने गेल्या महिन्यात जाहीर केले. त्यानुसार परीक्षेसाठी ऑनलाईन, ऑफलाईन पर्याय देणे, मॉक टेस्ट देणे आदी प्रक्रिया सुरू झाली. मात्र, जुन्या अभ्यासक्रमातील आणि बदललेल्या अभ्यासक्रमातील सब्जेक्ट कोडमध्ये फरक असल्याची तांत्रिक अडचण ही परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या निदर्शनास आली. या अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र, एसएमएस मिळालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी हितास्तव विद्यापीठाने बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बॅचलर ऑफ फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट, बी.एस्सी. फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट भाग तीन (सत्र पाच आणि सहा, नियमित आणि सीबीसीएस) या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वनियोजनानुसार विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी विद्यापीठाने हा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, बीएस्सी. बायोटेक, आयटी., शुगर टेक, बीबीए., बीसीए. आणि बी. व्होकच्या विविध १२ अशा एकूण २५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा सोमवारपासून ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत. या परीक्षांसाठी ७७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

प्रतिक्रिया...

सब्जेक्ट कोडमधील तांत्रिक अडचणीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी अंतिम वर्षातील बी.ए., बी.कॉम. आदी पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

- गजानन पळसे, प्रभारी संचालक, परीक्षा मंडळ.

Web Title: On extension of final year examination of BA, B.Com in winter session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.