बाजार समितीवरील अशासकीय मंडळाला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:24 PM2021-02-12T12:24:59+5:302021-02-12T12:26:28+5:30
Market Kolhapur- कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय मंडळाला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याला बाजार समित्यावगळता उर्वरीत सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम असल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील अशासकीय मंडळ ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत कायम राहणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय मंडळाला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याला बाजार समित्यावगळता उर्वरीत सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम असल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील अशासकीय मंडळ ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत कायम राहणार आहे.
भ्रष्टाचार चौकशी अहवालानंतर विद्यमान संचालक मंडळाने राजीनामा दिल्यानंतर आणि कोरोनाकाळ सुरू असल्याने पंचवार्षिक निवडणुका घेत नसल्याचे सांगत राज्याच्या पणन विभागाने कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. ४ फेब्रुवारीला या मंडळाची मुदत संपल्याने पुढे काय होणार याविषयी उत्सुकता होती.
बाजार समितीच्या निवडणुका जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार पुढील तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, याच कालावधीत सहकाराशी संबंधित कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या निवडणूका घेण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्याबाबतचा मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांच्यामार्फत पणन विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार शासनाने सर्व कारणांचा विचार करत मुदतवाढ देणेच आजच्या घडीला सोयीचे ठरणार असल्याचे सांगत राज्य शासनाने कार्यासन अधिकारी जयंत भोईर याच्याकरवी मुदतवाढीचे लेखी आदेश काढले आहेत.