मतदार यादीवरील हरकतीसाठी मुदतवाढ : पाच डिसेंबरपर्यंत दावे, हरकती स्वीकारल्या जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 03:25 PM2018-12-01T15:25:31+5:302018-12-01T15:26:58+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत या यादीवर हरकती व दावे सादर करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती; परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती पाच डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत या यादीवर हरकती व दावे सादर करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती; परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती पाच डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घेतला. यामध्ये जिल्ह्यात १ लाख २४ हजार ४३७ मतदार वाढले, तर ४ हजार २४३ मतदार हे विविध कारणांमुळे रद्द होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात प्राप्त अर्जांची शहानिशा व दावे हरकती घेण्यासाठी महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. त्याचा अखेरचा दिवस शुक्रवारी होता; परंतु निवडणूक आयोगाकडून यासाठी आणखी पाच दिवस मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाला कळविण्यात आले. त्यानुसार आणखी पाच दिवस म्हणजे पाच डिसेंबरपर्यंत मतदार यादीसंदर्भातील अर्जांच्या हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.
त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नियुक्ती केलेल्या १५ झोनल अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये कामाचे स्वरूप व जबाबदारी याबाबत संबंधितांना मार्गदर्शन केले जाणार आहे.