सातारा-कागल सहापदरीच्या निविदेला १२ वेळा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:56 PM2018-12-30T23:56:26+5:302018-12-30T23:56:37+5:30
तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे ते बंगलोरराष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागल या १३३ किलोमीटर लांबीच्या ...
तानाजी पोवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुणे ते बंगलोरराष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागल या १३३ किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्याचे काम रखडले आहे. गेल्या दीड वर्षांत निविदेला १२ वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी ‘निविदा-पे- निविदा’ अशी स्थिती झाली आहे. मुदतवाढ दिलेली निविदा आता दि. ४ जानेवारीला उघडण्याचे जाहीर केले असले तरीही परिस्थिती पाहता निविदेला पुन्हा मुदतवाढच मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) व राष्ट्रीय महामार्ग विभाग (एनएचएआय) यांच्यातील अंतर्गत वादामुळे टोल वसुलीच्या मुद्द्यावरून या निविदेला वारंवार मुदतवाढ देण्याचे काम मंत्रालय पातळीवरून होत आहे.
पुणे ते बंगलोरया राष्ट्रीय महामार्गाचे दुपरीकरणाचे काम २००२ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील करारानुसार चौपदरीकरणाचे नियोजन झाले. त्याचवेळी चारपदरी व सहापदरी रस्त्यासाठी ६० मीटर रुंदीची जमीन राष्टÑीय महामार्ग विभागाने अधिगृहण केली, तर राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २००५पर्यंत चौपदरीकरण केले. ‘बीओटी’ तत्त्वावर काम केल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाला या रस्त्यावर २०२२ पर्यंत टोलवसुली करण्याची मुदत दिली. त्याचवेळी किणी आणि तासवडे या दोन टोलनाक्यांचा उदय झाला.
महाराष्ट्रातील रस्त्याची मालकी ही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. त्यामुळे २०१४ या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत केले; पण कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दर्जाबाबत तुलना झाली. त्यामुळे पुणे-सातारा सहापदरीकरण टीकेचे लक्ष बनल्याने पुढील सातारा ते कागलपर्यंतचे सहापदरीकरण रखडले. या कामाची निविदा वारंवार प्रसिद्ध झाली, प्रतिसादही मिळाला पण मंत्रालयस्तरावर निविदा खुल्या करण्यासाठी ‘खो’ मिळत
आहे.
टोलवसुली करायची कोणी?
महाराष्ट्रातील दुपदरी व चारपदरी रस्ता हा राज्य रस्ते विकास महामंडळाने केला, त्या बदल्यात त्यांना २०२२ पर्यंत टोल आकारणी करता येणार आहे. हा रस्ता सहापदरीकरणाची करण्याची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली. पण, पुणे ते सातारा रस्ता हा सहापदरीकरण राष्टÑीय महामार्ग विभागामार्फत केला. आता सातारा ते कागलपर्यंत हा रस्ता तातडीने सहापदरीकरण पूर्ण केल्यास टोलची वसुली कोणी करायची? हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे सातारा ते कागलपर्यंतच्या रस्त्यासाठी ‘निविदा-पे- निविदा’ असे लालफितीत भिजत घोंगडे अडकले. या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम २०१९च्या अखेरीस प्रारंभ करून तो २०२२ पर्यंत पूर्ण करून संपूर्ण पुणे ते बंगलोर या रस्त्याची टोल वसुली करण्याच्या हालचाली राष्टÑीय महामार्ग विभागामार्फत केले जात आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग
- दुपदरीकरण पूर्ण : २००२, - चारपदरीकरण पूर्ण : २००५, - सहापदरीकरण पूर्ण : २०२२ (सद्या अपूर्ण)
अधिकाऱ्यांचे मौन
राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्र्ीय महामार्ग विभाग यांच्यात भविष्यात टोल आकारणी कोणी करायची याबाबत पूर्वीची करारातील मुदत संपण्याची वाट पाहिली जात आहे. हे सातारा-कागल सहापदरीकरण रखडण्याचे मूळ कारण आहे. याबाबत मंत्रालयातून हालचाली होत असल्यामुळे अधिकारी मात्र मौन बाळगून राहिले आहे.