माजी संचालकांना म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:00+5:302020-12-24T04:23:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीसाठी नेमलेल्या एक व्यक्ती न्यायाधिकरण एस. एस. परजणे यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीसाठी नेमलेल्या एक व्यक्ती न्यायाधिकरण एस. एस. परजणे यांनी माजी संचालकांना म्हणणे सादर करण्यासाठी मुदवाढ दिली आहे. अद्याप चौकशी अहवालच मिळाला नसल्याचे माजी संचालकांनी सांगितल्याने त्यांना अहवाल देण्याची सूचना बाजार समितीला केली. आता, २१ जानेवारी रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश परजणे यांनी दिले.
भूखंड भाडेतत्त्वावर देणे, गाळे बांधकाम, बेकायदा नोकर भरती, अल्प भाडेतत्त्वावर जागा वापरास देणे, आदी ठपके चौकशी समितीने बाजार समितीच्या माजी संचालकांवर ठेवले होते. बाजार समितीच्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार विभागाने पन्हाळ्याचे सहायक निबंधक एस. एस. परजणे यांची न्यायाधिकरण म्हणून नेमणूक केली होती. त्यांनी माजी संचालक व तीन सचिवांना नोटीस बजावत मंगळवारी लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार माजी संचालकांनी मंगळवारी मुदतवाढीची मागणी एकत्रितपणे केली. आमच्यावर काय ठपके ठेवले, याची माहिती अद्याप आम्हाला नसल्याने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी सभापती दशरथ माने यांच्या नेतृत्वाखालील माजी संचालकांनी परजणे यांच्याकडे केली. यावर २१ जानेवारी रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश परजणे यांनी दिले.
- राजाराम लोंढे