‘आयटीआय’ला अर्ज करण्यास शुक्रवारपर्यंत मुदतवाढ
By Admin | Published: July 2, 2017 06:11 PM2017-07-02T18:11:23+5:302017-07-02T18:12:04+5:30
अर्ज सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांची तुरळक गर्दी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0२ : तंत्रनिकेतनपाठोपाठ आता शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास पाच दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’साठी शुक्रवार (दि. ७) पर्यंत अर्ज करता येणार आहे. रविवारी आयटीआय आणि तंत्रनिकेतच्या अर्ज सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांची तुरळक गर्दी दिसून आली.
‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने सुरू आहे. या प्रक्रियेला तेरा दिवसांपूर्वी सुरुवात झाली. याअंतर्गत प्रवेश अर्ज करणे, त्यांची निश्चिती आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी रविवार (दि. २)पर्यंत अंतिम मुदत होती. मात्र, दहावीचा उशिरा जाहीर झालेला निकाल आणि यानंतर तब्बल १३ दिवसांनंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या आहेत. पाऊस सुरू असल्याने काही दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांची मुदतीत अर्ज करण्यातील अडचण लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. ७) पर्यंत अर्ज करता येणार आहेत. यात मुदतीत विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जातील दुरुस्ती आणि अर्जाची छापील प्रत घेता येणार आहे. यातील अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी १५ जुलैला सकाळी अकरा वाजता होईल. यानंतर प्रवेश फेऱ्यांबाबतचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्जविक्री, कागदपत्रांची पडताळणी आणि आॅनलाईन अर्जनिश्चितीची अंतिम मुदत शुक्रवार (दि. ३० जून) पर्यंत होती. याच दिवशी तंत्रशिक्षण संचालनालयाने संबंधित मुदत उद्या, मंगळवारपर्यंत वाढविली. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय व खासगी तंत्रनिकेतनासाठी या मुदतीपर्यंत अर्ज दाखल करणे, कागदपत्रांची पडताळणी करून आॅनलाईन अर्जनिश्चितीसाठी चार दिवस वाढवून मिळाले. बुधवारी (दि. ५) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, आयटीआय आणि तंत्रनिकेतनला अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाल्याने रविवारी अर्ज सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांची काहीशी तुरळक गर्दी दिसून आली. अनेक विद्यार्थ्यांनी रविवारी सुटी घेणे पसंत केले. कळंबा मार्गावरील आयटीआय येथे रविवारअखेर २८०२ अर्जांची निश्चिती झाली आहे.
‘आयटीआय’चे सुधारित वेळापत्रक
आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत : ७ जुलै (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) अर्ज निश्चितीची अंतिम मुदत : ८ जुलै (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प, प्राधान्य सादर करण्याची अखेरची मुदत : ९ जुलै (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) प्राथमिक गुणवत्ता यादीची प्रसिद्धी : ११ जुलै (सकाळी अकरा वाजता) गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे : १२ व १३ जुलै (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी : १५ जुलै (सकाळी अकरा वाजता)