वक्फ महामंडळ मतदार नोंदणीस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:28+5:302021-07-08T04:16:28+5:30
यड्राव : महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाच्या मर्यादित मतदारांमुळे सामाजिक विकासाचा समतोल साधला जात नव्हता. याकरिता वक्फ मतदार नोंदणीची मुदत ...
यड्राव : महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाच्या मर्यादित मतदारांमुळे सामाजिक विकासाचा समतोल साधला जात नव्हता. याकरिता वक्फ मतदार नोंदणीची मुदत वाढविण्याची मागणी अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर यांनी केली होती. या मागणीचा विचार करून ३१ जुलैअखेर मतदान नोंदणीस मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मुजावर यांनी दिली.
राज्यामध्ये ७ हजार २०० मशिदी, ३ हजार कब्रस्तान याशिवाय एक हजार वक्फ मिळकती अशी सुमारे ११ हजाराहून अधिक मिळकती आहेत. परंतु मर्यादित मतदार संख्येने समाजाची प्रगती होत नसल्याने जनजागृती करून मतदार संख्या वाढविणे गरजेचे होते. याकरिता मतदार नोंदणीची मुदत वाढवावी, अशी मागणी केली होती.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांचेकडून राज्यातील सर्व वक्फ संस्थांच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांना आवाहन करण्यात आले. ज्या वक्फ संस्थांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयेपेक्षा जास्त आहे, त्या वक्फ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित सदस्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता सन २०२०-२१ वर्षापर्यंत संबंधित संस्थेचे लेखापरीक्षण करून वार्षिक लेखे व त्याअनुषंगिक वर्गणी जमा करण्याची मुदत वाढविण्यात आली असून ती ३१ जुलै अखेर करण्यात आली आहे, अशी माहिती मुजावर यांनी दिली.