कचरा कॅपिंग निविदेला मुदतवाढ, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:57 PM2019-03-06T12:57:59+5:302019-03-06T13:01:08+5:30
कसबा बावडा येथील डंपिंग ग्राऊंडवर साचलेल्या कचऱ्यावर कॅपिंग करण्याकरिता ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे यासंबंधीच्या निविदेला पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका आरोग्य विभागाने घेतला आहे.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डंपिंग ग्राऊंडवर साचलेल्या कचऱ्यावर कॅपिंग करण्याकरिता ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे यासंबंधीच्या निविदेला पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका आरोग्य विभागाने घेतला आहे.
शहरातील साचलेला कचऱ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता महापालिका प्रशासनाने कसबा बावडा येथील डंपिंग ग्राऊंडवर कॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा खर्च सुमारे नऊ कोटी रुपये आहे. या कामासाठी पात्र ठेकेदारांकडून निविदा मागविल्या होत्या. आज त्याचा शेवटचा दिवस होता; परंतु ठेकेदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दोनच ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. शासन मार्गदर्शनानुसार तीनपेक्षा कमी निविदा आल्यास मुदतवाढ देण्यात येते; त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
मुळात सध्याच्या कचऱ्यांच्या ढिगावर कॅपिंग करणे भविष्यकाळाचा विचार करता, व्यावहारिकदृष्ट्या सोईचे नाही. तरीही मागील आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी तसा निर्णय घेतला. त्यास राज्य सरकारची परवानगीही मिळविली आहे. वास्तविक या ठिकाणी कॅपिंग केले तर येथील जागेचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे; त्यामुळे भविष्यात कचरा डंपिंग करणार कोठे? हा प्रश्न आहे.
या आधी हा सर्व कचरा टाकाळा येथील खाणीत टाकण्यात यायचा होता; त्यासाठी अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून तेथे कचरा टाकण्याकरिता शास्त्रशुद्ध पद्धतीने खण विकसित केली होती; परंतु कसबा बावडा येथील डंपिंग ग्राऊंडवरील विघटन न होणारा कचरा टाकाळा येथे आणून टाकण्याकरिता येणारा वाहतूक खर्च अंदाजे १४ ते १५ कोटी येणार असल्याने त्यापेक्षा तुलनेने कमी खर्चाचा कॅपिंग करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे.