रंकाळा तलावातील मत्स्य जाती होताहेत नामशेष : प्रदूषणाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:09 AM2018-12-20T00:09:39+5:302018-12-20T00:10:13+5:30
अमर पाटील । कळंबा : कधी काळी जैवविविधतेसह विविध प्रकारच्या मत्स्य जाती आढळणाऱ्या रंकाळा तलावास आज प्रदूषणाचे ग्रहण लागले ...
अमर पाटील ।
कळंबा : कधी काळी जैवविविधतेसह विविध प्रकारच्या मत्स्य जाती आढळणाऱ्या रंकाळा तलावास आज प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. पाणी प्रदूषणात वाढ झाल्याने वाम, मरळ, कटला व रोही या जातींचे मोठ्या प्रमाणावर आढळणारे मासे नामशेष होऊ लागल्याने चिलाप जातीचा एकमेव मासाच आता जास्त प्रमाणात भव्य जलाशयातून मच्छिमारांच्या हाती लागत असल्याने जिल्ह्यात नावलौकिक असणाºया रंकाळा तलावातील गोड्या पाण्यातील मासा आता बेचव झाला आहे.
पूर्वी गोड्या पाण्यातील चवदार मासा म्हटले की, रंकाळा तलावाचे नाव घेतले जायचे. भागातील हजारो कुटुंबियांचा उदरनिर्वाह पूर्वी विविध प्रजातींच्या चवदार आढळणाºया मासेमारीवर चालायचा. सुरुवातीला तलावात प्रामुख्याने वाम, मरळ, कटला, रोही, शिंगटा, गुगळी, चिलाप, चांभोरी, बोदवा, श्ािंगी, मांगूर, झिंगा, अरळी, कानस, गवत्या, डोकडा असे नानाविध प्रकारचे चविष्ठ मासे मोठ्या प्रमाणात मच्छिमारांच्या जाळ्यासह गळासही लागत होते.
रंकाळा तलावात मिसळणाºया प्रदूषित पाण्याने वाम, मरळ, कटला, आहेर, खद्री, रोही, डोकडा या चवदार माशांची वाढ होत नाही, तर चिलाप मासा या प्रदूषित पाण्यात तग धरून राहू शकत असल्याने चवदार माशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, चिलाप हा मासा तलावात आज मोठ्या प्रमाणावर जाळ्यात सापडत आहे.
चिलाप माशांचे अनेक गुणधर्म इतर माशांच्या जातींसाठी त्रासदायक असतात. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये व प्रदूषित पाण्यातही ते राहू शकतात. रंकाळा तलावात चिलाप माशांची वाढ होण्याचे आणखी कारण म्हणजे त्यांच्याकडे प्रदूषित पाण्यात प्रचंड पचनक्षमता असल्याने त्यांच्या वाढीस बळ मिळत आहे.
अलीकडे दहा-बारा वर्षांत चिलाप मासाच ९० टक्के मिळू लागला आहे. वाम, मरळ, कटला व रोही मासे दुर्मीळ झाले आहेत. आहेर व खद्री मासा तर नामशेष झाला आहे. पर्यावरणपे्रमींनी प्रदूषणमुक्त रंकाळा मोहीम राबविण्याची, तर पालिका जैवविविधता समितीने विविध मत्स्य जाती सोडण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
प्रदूषणामुळे जैवविविधतेवर परिणाम
तलावाभोवती नागरी वस्त्यांचा मोठा विळखा पडला असून, याचे सांडपाणी थेट तलावात मिसळत आहे. पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढल्याने तलावात विषारी जलपर्णी फोफावल्या आहेत. प्लास्टिकचे विघटन न होणारा कचरा तलावात तरंगत आहे. पाण्याचा वापर जनावरांना अंघोळ, कपडे धुणे यासाठी होत आहे. परिणामी, माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन तलावातील जैवविविधतेवर याचा मोठा परिणाम होत आहे.
‘मत्स्यबीज विभागाचे मदतीने रंकाळा तलावातील विविध मत्स्य जातींचा अभ्यास करून प्रशासनास अहवाल सादर केला. पूर्वी तलावात ७२ विविध प्रजातींचे मासे आढळून येत होते. २००९ च्या पाहणीत फक्त ३० प्रजाती आढळून आल्या. पर्यावरणाचा ºहास, नैसर्गिक स्थित्यंतरे व जलपर्णीची व्याप्ती, वाढते प्रदूषण यामुळे रंकाळा तलावातील माशांच्या विविध प्रजाती कमी होत आहेत. मत्स्यबीज विभाग, पालिका प्रशासन व पालिका जैवविविधता समिती याबाबत गंभीर नाही’
- उदय गायकवाड, पर्यावरण तज्ञ व सदस्य पालिका जैवविविधता समिती