करणी काढणे, खजिन्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:41+5:302020-12-13T04:37:41+5:30
नेसरी : आपल्या घरावर करणी केली आहे, तो दोष दूर करण्यासाठी विविध उपाय सुचवितो, तसेच घरातील सोन्याचा खजिना मिळवून ...
नेसरी : आपल्या घरावर करणी केली आहे, तो दोष दूर करण्यासाठी विविध उपाय सुचवितो, तसेच घरातील सोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. शिरसंगी (ता. आजरा) येथील बाळू धोंडीबा दळवी (वय ४७) या संशयित भोंदूबाबाविरोधी नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एका महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी दळवी याच्यासह लक्ष्मण सुतार, तसेच सावंतवाडी येथील दोघांविरुद्ध जादूटोणा व अघोरी कृत्य केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
नेसरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पीडित महिला नेसरी येथे राहते. तिने आपल्यावर डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०२० दरम्यान संशयित आरोपी बाळू दळवी याने मी बाळूमामाचा अवतार असून, माझ्याकडे दैवी व अलौकिक शक्ती आहे असे म्हणून तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे ती काढतो, तसेच तुमच्या घरात सोन्याचा खजिना असून तो मिळवून देतो, असे सांगत आरोपी दळवीसह लक्ष्मण सुतार व सावंतवाडी येथील दोन व्यक्तींनी आपल्यावर अनिष्ट व अघोरी प्रकार करून जादूटोणा केला. तसेच दळवी याने आपल्या घरी डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०२० संमतीशिवाय जबरदस्तीने शरीरसंबंध ठेऊन अत्याचार केला अशी फिर्याद पीडित महिलेने नेसरी पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी दळवी नामक भोंदूबाबाला नेसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.
चौकटी.
#संशयित बाळू दळवी हा स्वतःला संत समजत होता. भूलथापा देऊन अनेकांना त्याने फसविले असल्याची परिसरात चर्चा आहे. त्याचे या उपविभागात अनेक भक्त असल्याचेही समजते. मात्र, त्याच्या या कृष्णकृत्याचा प्रताप यानिमित्ताने दिसून आल्याने त्याच्या भक्तासह नागरिकांत खळबळ उडाली आहे.
# या स्वयंघोषित देवर्षी बाळू दळवी हा शिरसंगी येथील आपल्या घरी संत बाळूमामा यांचा फोटो लावून आपण बाळूमामांचे सच्चे भक्त असल्याचा दिखावा करीत असे. त्याच्या घरी अडीअडचणी सोडविण्यासाठी गरीब लोक येत असत. त्यांच्या समोर भोंदू बाळू दळवी हा दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करीत असे. तसेच हा पूर्वी जमिनीचे व्यवहार करीत असल्याचे, तर नेसरी जवळील एका खेड्यात बीअर बार चालवायला घेतला होता अशीही चर्चा आहे.