ग्रामीण रस्त्यांसाठी जादा निधी

By admin | Published: November 17, 2016 01:06 AM2016-11-17T01:06:04+5:302016-11-17T01:10:05+5:30

दादा भुसे : जिल्हा परिषदेत घेतलेल्या आढावा बैठकीत माहिती

Extra fund for rural roads | ग्रामीण रस्त्यांसाठी जादा निधी

ग्रामीण रस्त्यांसाठी जादा निधी

Next

कोल्हापूर : ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी जादा निधीची तरतूद करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कामकाजाच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींबाबतही ऊहापोह करण्यात आला.
दुपारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित या बैठकीत मंत्र्यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरणाद्वारे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची माहिती दिली.
यावेळी मंत्री भुसे म्हणाले,‘भारत निर्माण योजने’मध्ये कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, तरीही अनेक गावांना पिण्याला पाणीही नाही, अशी अवस्था आहे. अनेक योजनांबाबत अशीच परिस्थिती असल्याने आपणही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेकडे तीन लाख किलोमीटरचे रस्ते आहेत. मात्र, याआधी त्यासाठी केवळ ३०० ते ३५० कोटी रुपयांची तरतूद होत होती. आता मात्र या कामासाठी अधिकचा निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दर्शविली असून लवकरच ही बैठक होत आहे तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री सडक योजनेप्रमाणे इतर रस्त्यांच्या कंत्राटदारांनाही देखभाल आणि दुरुस्ती सक्तीची केली जाईल.
आमदार प्रकाश आबिटकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. ‘हागणदारी मुक्त जिल्हा’ केल्याबद्दल अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा कृषि अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, बांधकाम व आरोग्य समिती सभापती सीमा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, आमदार उल्हास पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख व विभागप्रमुख उपस्थित होते. संजय लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.


यांनी केल्या मागण्या
आमदार सुजित मिणचेकर - आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणात नावे नसलेल्यांनाही रमाई आवास योजनेचा लाभ द्या.
विष्णुपंत केसरकर (सभापती, आजरा) - घरकुलासाठी सिटी सर्व्हेत जागा असेल तर निकष शिथील करून परवानगी द्या.
राजेश पाटील (हातकणंगले)- पाणंदीसाठी कोणतीही योजना नाही. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
हिंदुराव चौगुले (जि. प. सदस्य)- दोन वर्षांपूर्वी केलेला विकास आराखडा लांबला आहे. निधीही विलंबाने दिला जातो. त्यात सुधारणा व्हावी.
धैर्यशील माने (जि. प. सदस्य)- रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती कंत्राटदारांकडून होत नाही तरीही अनामत रकमा परत दिल्या जातात.
पंडित नलवडे (सभापती शाहूवाडी)- जिल्हा परिषदेतील रिक्त पदे तातडीने भरा.
विलास कांबळे (सभापती, भुदरगड) ‘नरेगा’तील विहिरींसाठी अंतराची अट रद्द करा.
जिल्हा परिषदेचे कौतुक
यावेळी मंत्र्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, स्वच्छतेमध्ये देशात अव्वल स्थान पटकावत कोल्हापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. अन्य विभागांचेही कामकाज चांगले चालले असून राज्यातील चांगल्या जिल्हा परिषदांच्या योजनांचे आदानप्रदान व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा परिषद इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प
जिल्हा परिषदेच्या इमारतीवर ८० लाख रुपये खर्चून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. आवश्यक वीज वापरून उर्वरित वीज ‘महावितरण’ला देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. खेमनार म्हणाले, जिल्ह्णातील ९८ ग्रामपंचायतींमध्ये एकही स्मशानशेड नाही. त्या ठिकाणी जनसुविधा योजनेतून स्मशानशेड बांधण्यात येणार आहे. स्वच्छ शाळा स्पर्धेत जिल्ह्णातील ३५ शाळा पात्र ठरल्या आहेत.

Web Title: Extra fund for rural roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.