जनसामान्यांचे आसामान्य नेतृत्व : ए. वाय. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:53+5:302021-04-21T04:23:53+5:30
जिल्ह्यातील विविध निवडणुकीत राजकीय घडामोडीतील जुळवाजुळवीत मुश्रीफ देतील कामगिरी ए. वाय. फत्ते करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे ...
जिल्ह्यातील विविध निवडणुकीत राजकीय घडामोडीतील जुळवाजुळवीत मुश्रीफ देतील कामगिरी ए. वाय. फत्ते करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे त्यांच्यावर मुश्रीफ यांचा विश्वास आहे. राजकीय तोटा झाला तरी चालेल, पण दिलेला शब्द पाळणार, अशी त्यांची ख्याती आहे. म्हणून सर्वांच्या मनात ए. वाय. पाटील यांचे नाव कोरले गेले आहे.
राधानगरी तालुक्यासारख्या दुर्गम भागात दूधगंगा काठावर सोळांकूर या छोटेखानी गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात ए. वाय. पाटील यांचा जन्म झाला. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यावर पाटबंधारे विभागात काहीकाळ नोकरी केली. या काळात वडील बारा खेड्यांचे पोलीसपाटील असल्यामुळे पंचक्रोशीतील अनेक लोकांचा त्यांच्या घरी किरकोळ कामे व लहानसहान तंटे मिटवण्यासाठी राबता असायचा. याचेच त्यांनी बाळकडू घेऊन हळूहळू समाजकार्यात ते सहभागी होऊ लागले.
खऱ्या अर्थाने त्यांनी १९९५ मध्ये प्रस्थापितांना धक्का देत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही. त्यांचा राजकीय आलेख हा गेल्या सत्तावीस वर्षांत हा स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारातील संस्थेमध्ये वाढतच राहिला. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, बिद्री साखर कारखाना उपाध्यक्ष, एस. टी. महामंडळ सदस्य व सलग वीस वर्षे के. डी. सी. सी. बँक संचालक ते अध्यक्ष असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याची एक वेगळी लकब त्यांच्याकडे असल्यामुळे दररोज सकाळी सातपासून त्यांच्या घरामध्ये जनता दरबार भरलेला असतो. भेटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपुलकीने चौकशी करून त्यांच्या सुखदुःखातही ते नेहमी सहभागी होतात. तसेच त्यांनी सत्तेचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी असतो, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. वेगवेगळ्या सत्तेमध्ये कार्यकर्त्यांना संधी देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्यांना मानसन्मान दिला.
ग्रामीण दुर्गम भागातील मुलांची शिक्षणाची सोय जवळ व्हावी, या उद्देशाने त्यांनी व्यंकनाथ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून पाचवीपासून ते पदवीपर्यंत शिक्षणाची सोय करून दिली. या संकुलात आज दोन हजार विद्यार्थी अध्ययनाचे धडे गिरवत आहेत. त्याचबरोबर भविष्यात पदव्युत्तर, अभियांत्रिकी, मेडिकल, कृषी यांचे अभ्यासक्रमही सुरू करण्याचा मानस आहे.
ग्रामदैवत व्यंकनाथ, वडील स्व. यशवंतराव पाटील, भाऊ स्व. एस. वाय. पाटील यांच्या आशीर्वादाने राजकीय, सामाजिक जीवन वाटचालीत कितीही चढउतार आले तरी न डगमगता आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत त्यांनी आपली राजकीय घोडदौड सुरू ठेवली आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी व संचालिका अर्चना पाटील व त्यांचे भाऊ बाजार समितीचे संचालक, सरपंच आर. वाय. पाटील यांची लक्ष्मणासारखी साथ आहे. अमित पाटील व अवि पाटील ही मुले तसेच इतर कुटुंबीयातील सदस्यांचीही त्यांना मोलाची साथ आहे. उर्वरित आयुष्यात त्यांना मोठमोठी राजकीय पदे मिळो व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !
निवास पाटील, सोळांकूर.