अतिवृष्टीबरोबरच मानवी चुकांमुळे महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:01 AM2019-08-16T11:01:37+5:302019-08-16T11:04:31+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकाच वेळी धरण तसेच नदीक्षेत्रांत झालेला दुप्पट पाऊस, पूररेषेतील बांधकामे तसेच ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ तंतोतंत हाताळण्यात झालेल्या मानवी चुका यांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यातही हलगर्जीपणा झाल्याचे सांगण्यात येते.
भारत चव्हाण
कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकाच वेळी धरण तसेच नदीक्षेत्रांत झालेला दुप्पट पाऊस, पूररेषेतील बांधकामे तसेच ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ तंतोतंत हाताळण्यात झालेल्या मानवी चुका यांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यातही हलगर्जीपणा झाल्याचे सांगण्यात येते.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना बसलेल्या महापुराला कोणतीही एक घटना जबाबदार नाही तर अनेक कारणे आहेत. निसर्गाचा प्रकोप तर आहेच; शिवाय मानवी चुकासुद्धा झाल्याची बाब समोर येत आहे. यावर्षी जून महिना कोरडा गेला, पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातही तशीच अवस्था होती.
जुलैच्या शेवटी-शेवटी पावसाने जोर धरला. पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाणी सोडायचे की नाही अशा संभ्रमात जलसंपदाचे अधिकारी होते. अलमट्टी धरणाचे जबाबदार अधिकारीही अशाच संभ्रमात राहिले. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाणी अडवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले.
अचानक जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला आणि आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात तर तो अधिकच वाढला. धरणक्षेत्र तसेच नदीक्षेत्रात एकच वेळी दुप्पट-तिप्पट पाऊस पडू लागला. बघता-बघता कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील धरणांतून विसर्ग वाढवला. कृष्णा, कोयना, वारणा व पंचगंगा नद्यांना एकाच वेळी महापूर आल्यामुळे त्याची तीव्रता वाढली.
महापुराचे पाणी अलमट्टी धरणाच्या दिशेने पुढे सरकत होते, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनीही येणारे पाणी अडवून ठेवण्याचे काम केले. परिणामी महापुराची परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बसला, असा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे.
पूररेषेतील बांधकामांचा फटका
नदीकाठावर होत असलेले अतिक्रमण हेही एक कारण महापुराबद्दल सांगितले जात आहे. प्रत्येक शहरात, गावात नदीकाठावर पूररेषेच्या आत मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊ लागली आहेत. त्यावर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी साठवून ठेवण्याची (बेसिन) क्षमता कमी होत असून पाणी नागरी वस्तीत घुसत आहे. मोठा पाऊस झाला की नदी आपल्या मूळ पात्रात महापुराचे पाणी सामावून घेऊ शकत नाही.
गेट आॅपरेशन शेड्युल चुकले
पाच आॅगस्टपासून महापुराची वाटचाल विध्वंसाकडे सुरू झाली तेव्हा धरणाचे ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ चुकत असल्याचे जाणवत होते. दुप्पट-तिप्पट पाऊस होत असताना सगळी धरणे एकाच वेळी भरली. त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद ६ लाख ८० हजार क्युसेक पाणी येऊन मिसळत असताना तेथील अधिकाऱ्यांनी त्याच्या बदल्यात ५ लाख ३० हजार क्युसेक्स पाणी धरणातून सोडण्यात येत होते. याचा अर्थ प्रतिसेकंद दीड लाख क्युसेक्स पाणी धरणात साठत होते. म्हणूनच पाण्याची फुग वाढली, पाणीही लवकर उतरत नव्हते, असे या क्षेत्रातील अभ्यासक बी. एस. घुणकीकर यांनी सांगितले.
कोल्हापुरातील पाऊस
- गतवर्षी १२ आॅगस्टपर्यंत झालेला पाऊस - ७७७ मी.मी.
- यावर्षी १२ आॅगस्टपर्यंत झालेला पाऊस - १४२८ मी.मी.