आरक्षण सोडतीबद्दल कमालीची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:48 AM2020-12-17T04:48:34+5:302020-12-17T04:48:34+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (दि. २१) होत असलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीसंदर्भात शहरवासीयांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. ...
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (दि. २१) होत असलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीसंदर्भात शहरवासीयांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या तीन निवडणुकांच्या आरक्षणाची माहिती घेऊन प्रत्येक इच्छुक आपापल्या पद्धतीने आपल्या प्रभागावर ‘अमुक’ एक आरक्षण पडणार, असा अंदाज बांधण्यात मग्न झाले आहेत.
शहरातील ८१ प्रभागांतील आरक्षण सोडत येत्या सोमवारी काढण्यात यावी, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून महापालिकेला येताच ही वार्ता काही मिनिटांत संपूर्ण शहरभर पसरली आणि शहरात चर्चेला, आडाखे बांधण्याला उधाण आले. जो तो आपापल्या प्रभागावरील आरक्षणाचीच चर्चा करू लागला; तर काहीजण प्रभाग आरक्षण सोडत कशी असते, याची माहिती घेण्याच्या मागे लागले.
अशी असेल आरक्षण सोडत -
१. सोमवारी सकाळी ११ वाजता सोडतीला सुरुवात होईल. प्रथम प्रभाग क्रमांक १ ते ८१ यांच्या माहितीचे मोठ्या पडद्यावर चलत्चित्राद्वारे सादरीकरण केले जाईल. त्यामध्ये प्रभागाची चतु:सीमा, लोकसंख्या, नकाशा, मागील आरक्षणाची माहिती दिली जाईल.
२. सर्वांत प्रथम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ११ प्रभाग निश्चित केले जातील. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निश्चित होईल. या ११ प्रभागांतून सहा प्रभागांचे त्याच प्रवर्गातील महिलांसाठी सोडतीद्वारे आरक्षण निश्चित केले जाईल. राहिलेले पाच प्रभाग हे त्याच प्रवर्गासाठी पुरुषांकरिता आरक्षित होतील.
३. नंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २२ प्रभाग निश्चित केले जातील. सन २००५, सन २०१० व सन २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत ज्या प्रभागावर ‘नागरिकांचा मागास’ असे आरक्षण नसेल अशा प्रभागांचा सोडतीत समावेश केला जाईल. म्हणजेच मागच्या निवडणुकीत सर्वसाधारण, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभागांचा त्यात समावेश राहील.
४. नागरिकांचे मागास प्रवर्गातील २२ प्रभाग निश्चित झाल्यानंतर त्यातील ११ प्रभाग हे त्याच प्रवर्गातील महिलांसाठी सोडतीद्वारे आरक्षित केले जातील.
५. अनुसूचित जाती- पुरुष / महिला तसेच नागरिकांचा मागास - महिला/ पुरुष अशी आरक्षणे निश्चित झाल्यानंतर ४८ प्रभाग राहतील. त्यातून २४ प्रभाग हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडतीद्वारे आरक्षित केले जातील, तर राहिलेले २४ प्रभाग आपोआपच सर्वसाधारण राहतील.