वरवर शांतता; आतून तणाव, किरकोळ वाद

By admin | Published: November 2, 2015 12:51 AM2015-11-02T00:51:40+5:302015-11-02T00:56:38+5:30

प्रभागांतील परिस्थिती : शिवाजी पेठेत दोन इंगवले गट समोरासमोर

Extremely peaceful; Internal tension, retail dispute | वरवर शांतता; आतून तणाव, किरकोळ वाद

वरवर शांतता; आतून तणाव, किरकोळ वाद

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. शहराच्या बहुतांश प्रभागांत मतदानावेळी वरवर शांतता दिसत असली तरीही किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. रुईकर कॉलनी येथे भाजप समर्थकांनी मतदानाला येताना रॅली काढल्याने वादावादीचा प्रकार घडला. याशिवाय रंकाळा स्टॅँड प्रभागात रेगे तिकटी येथे पैसे वाटल्याच्या संशयाच्या वादातून दोन गटांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र हायस्कूल मतदान केंद्रावर दोन इंगवले गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. याशिवाय मार्केट यार्डसह अनेक प्रभागांत मतदान केंद्रात जाण्यावरून पोलीस, उमेदवार आणि कार्यकर्त्यांत किरकोळ वादावादीचे वारंवार प्रकार घडत होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीचा धाक दाखवून जमावाला पांगविल्याने पुढील अनर्थ टळले; पण प्रत्येक प्रभागात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
शहरातील प्रत्येक प्रभागात किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. काही ठिकाणी मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी दोन उमेदवारांच्या समर्थकांत खटके उडाले; तर काही ठिकाणी पैसे वाटल्याच्या संशयावरून वादाला तोंड फुटले. अनेक ठिकाणी मतदान केंद्रात जाण्यावरून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची पोलिसांशी वारंवार वादावादी होती होती.
इंगवले समर्थकांवर सौम्य लाठीमार
महाराष्ट्र हायस्कूल येथील मतदान केंद्राबाहेर दुपारी साडेचारच्या सुमारास नगरसेवक रवी इंगवले व त्यांचे प्रतिस्पर्धी अजय इंगवले हे दोघेजण आमने-सामने आले. यावेळी दोघांचेही शंभरपेक्षा जास्त कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगविले. (प्रतिनिधी)
रेगे तिकटी
चौकात वादावादी
गंगावेश येथील रेगे तिकटी चौकात दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन गटांच्या समर्थकांत पैसे वाटल्याच्या संशयावरून शाब्दिक वादावादी झाली. यावेळी दोन्ही बाजूंचे शंभरभर कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेत लाठीचा धाक दाखवीत कार्यकर्त्यांना पांगविले. यावेळी कार्यकर्त्यांनी शंभर मीटरच्या आतमध्ये मोटारसायकल पार्किंग केल्या होत्या. त्यांतील हवा पोलिसांनी सोडली.
‘भाजप-ताराराणी’ समर्थकांच्या रॅलीने रुईकर कॉलनीत वादावादी
कोल्हापूर : रुईकर कॉलनीतील हिंद को-आॅप. हौसिंग सोसायटीसमोर हिंद विद्यामंदिर येथे मतदान केंद्रावर दुपारी साडेबाराच्या सुमारास येथील भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार यांचे समर्थक डोक्यावर भाजपचे चिन्ह असलेल्या टोप्या आणि गळ्यात स्कार्फ घालून रॅलीने मतदान केंद्राकडे आले. त्यात बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. या रॅलीमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार व त्यांच्या मतदान केंद्रातील प्रतिनिधींनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यासह या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी रॅली काढलेल्या संबंधित समर्थकांना रोखले. भाजपचे चिन्ह असलेल्या टोप्या व स्कार्फ असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याने ते काढून मतदान करण्यासाठी केंद्रात जाण्यास पोलिसांनी त्यांना सांगितले. मात्र, समर्थक आपल्या मुद्द्यांवर ठाम राहिल्याने पोलीस व त्यांच्यात वादावादी झाली. अखेर पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच संबंधित समर्थकांपैकी काहींनी टोपी आणि स्कार्फ काढून मतदानाचा हक्क बजाविला. संबंधित समर्थकांच्या या रॅलीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला. त्यांच्यात आणि भाजप-ताराराणीच्या समर्थकांत बाचाबाची झाली. याबाबत त्यांनी येथील मतदान केंद्राधिकारी यांच्याकडे आचारसंहिता भंग झाल्याबाबतची तोंडी तक्रार केली. या प्रकारामुळे या ठिकाणी काही काळ तणाव पसरला होता. या रॅलीमध्ये अधिकतर मतदान करून आलेल्या समर्थकांचा समावेश असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांनी सांगितले. राजर्षी शाहू मार्केट यार्ड प्रभागासाठी तंबाखू संघात मतदान केंद्र होते. या ठिकाणी मतदान करण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांत किरकोळ बाचाबाची झाली.

Web Title: Extremely peaceful; Internal tension, retail dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.