राधानगरी अभयारण्यात अतिदुर्मिळ वाघाटीचे दर्शन, समृध्द जैवविविधतेवर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 07:34 PM2022-02-06T19:34:02+5:302022-02-06T19:35:00+5:30
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत प्रदेशनिष्ठ परिसरातील वाघाटीचा वावर राधानगरीत असल्याचा हा पहिलाच अधिकृत पुरावा
संदीप आडनाईक
कोल्हापूर : सह्याद्रीमधील जैवविविधतेने समृध्द असलेल्या राधानगरी अभयारण्यात निशाचर अतिदुर्मिळ वाघाटीचे दर्शन घडले आहे. वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या वाघाटीचे छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत प्रदेशनिष्ठ परिसरातील वाघाटीचा वावर राधानगरीत असल्याचा हा पहिलाच अधिकृत पुरावा या छायाचित्रामुळे मिळाला आहे.
राधानगरी अभयारण्यांत गतवर्षी झालेल्या प्राणीगणनेचा अहवाल गेल्याच महिन्यात कोल्हापूर वन्यजीव विभागाने प्रसिध्दीस दिला होता. यानुसार ३५१.१६ चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या अभयारण्य क्षेत्रात सुमारे २७ तृणभक्षी प्राणी आढळले होते. अहवालानुसार मांसभक्षी प्राण्यांमध्ये बिबट्यासह जंगली कुत्रा, खवल्या मांजर, साळींदर, अस्वल यांच्या नोंदी केल्या असल्या तरी वाघाटीची नोंद मात्र झाली नव्हती.
वाघाटीच्या वावराचे राज्यात फक्त चार अधिकृत नोंदी आहेत. २०१७ मध्ये महाबळेश्वरमध्ये एका रस्ते अपघातात एका वाघाटीच्या मृत्यूची नोंद वन खात्याकडे होती. त्यानंतर २०१९ मध्ये दाजीपूरमध्ये वाघाटीचे दर्शन झाल्याची नोंद होती.
वाघाटी किंवा बिबट मांजर हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरील ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर सह्याद्रीमधील कळसूबाईपासून कन्याकुमारीपर्यंतच्या पर्वतरांगेत आढळतो. या मांजराचा वावर प्रामुख्याने मानवी वस्तीच्या जवळ असतो. वाघाटी हा फेलिडो कूळातील कणाधारी सस्तन प्राणी आहे. हा मांसभक्षक प्राणी मात्र अतिदुर्मिळ आहे.
राधानगरीच्या अभयारण्यात प्रथमच वाघाटीच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे. ज्यामुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे. राज्य सरकारने राधानगरीसह राज्यातील आठ वनपट्ट्यांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीमधील वन्यजीव सुरक्षित होणार असल्याचे म्हटले जात होते. आता त्यासंबंधीचा पुरावा हाती लागला आहे.
राधानगरीत येणाऱ्या पर्यटकांनी वाघ दिसल्याचे सांगितल्यानंतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)चे सुनील लिमये यांनी अभयारण्य परिसरात २० कॅमेरा ट्रॅप लावले होते. यातील ११ कॅमेऱ्यातून चांगली छायाचित्रे मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी रात्री या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाटीचे छायाचित्र मिळाल्याची माहिती कोल्हापूर वन्यजीव विभागाचे वनाधिकारी तुषार माळी यांनी दिली आहे.
मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही बेन क्लेमंट यांनी 'लोकमत'ला सांगितले,की वाघाटीचे दर्शन म्हणजे राधानगरी अभयारण्यातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित असल्याचे अधोरेखित होते. क्लेमेंट यांनी हे छायाचित्र ट्विटरवर प्रसिध्द केले आहे.