हद्दवाढ अपरिहार्यच; प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घ्या
By admin | Published: July 25, 2014 12:48 AM2014-07-25T00:48:05+5:302014-07-25T00:48:18+5:30
मुंबईत बैठक : महापालिका आयुक्त बिदरी यांची प्रधान सचिवांकडे विनंती; ठोस निर्णय नाही
कोल्हापूर : शहराचा आणि शहरालगतच्या गावांचा सुनियोजित विकास करायचा असेल, तर हद्दवाढ करणे अपरिहार्य आहे. तेव्हा हद्दवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, गुरुवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांच्याकडे केली. आज मुंबईत झालेल्या बैठकीत कोल्हापूर महापालिका प्रशासनाने हद्दवाढीच्या प्रस्तावाची विस्तृत माहिती श्रीकांत सिंह यांना करून दिली.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ हा सध्या शहर परिसरातील गाजत असलेला विषय आहे. महानगरपालिका प्रशासनाने हद्दवाढ करावी म्हणून आग्रह धरला आहे, तर ज्या सतरा गावांचा समावेश अपेक्षित आहे, त्या गावांतील नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. त्यातच उच्च न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत हद्दवाढीबाबत निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीकडे महापालिकेबरोबरच हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या १७ गावांतील लोकांचे लक्ष लागून राहिले होते.
हद्दवाढीला असलेल्या विरोधाची श्रीकांत सिंह यांना माहिती आहे. त्यामुळे महापालिकेची काय भूमिका आहे, प्रस्तावित गावांच्या लोकसंख्येची घनता, दरडोई उत्पन्न, आदी माहिती त्यांनी करून घेतली; परंतु कोणताही ठोस निर्णय यावेळी झाला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे ३१ जुलैपर्यंत हद्दवाढीचा निर्णय होण्याबाबत संदिग्धता आहे. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक एम. डी. राठोड उपस्थित होते. (प्रतिनिधी)