त्या ३५ जणांची डोळसांनाही मागे टाकणारी कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:27 AM2021-02-16T04:27:00+5:302021-02-16T04:27:00+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातील दिव्यांग किरण चेचर, शुभम चौगुले यांनी कोल्हापूर ते विशाळगड असा खास दिव्यांग (अंध) मुलां-मुलींकरिता अनोखी पदभ्रमंती ...
कोल्हापूर : कोल्हापुरातील दिव्यांग किरण चेचर, शुभम चौगुले यांनी कोल्हापूर ते विशाळगड असा खास दिव्यांग (अंध) मुलां-मुलींकरिता अनोखी पदभ्रमंती आयोजित केली होती. या मोहिमेत कोल्हापूरसह पुणे, मुंबईतील ३५ जणांनी सहभाग घेत डोळसांनाही लाजवेल असा उत्साह दाखवत ही मोहीम फत्ते केली.
या मोहिमेची सुरुवात शिवाजी पार्कातील विक्रम हायस्कूल येथे रविवारी (दि. १४) प्रकाश पाटील व प्रकाश नलवडे या मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. यात कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील ३५ दिव्यांग मुला-मुलींनी या मोहिमेत सहभाग घेतला. विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर शुभम चौगुले, सोनिया चौगुले, आनंदा चौगुले, शंतनु माजगावकर, किरण चेचर, शुभम कुंभार यांनी या ३५ जणांना मदतीचा हात देत पायऱ्यावरून गडावर पोहोचविले. तेथे स्पर्शज्ञान, गंध, आवाज याद्वारे गडावरील पाने, फुले, शिळा यांची माहिती इतिहास अभ्यासक अनिकेत कासोटे यांनी दिली. विशेष म्हणजे लहानग्या अनन्या कांबळे हिने व आनंदा चौगुले यांनी दोन वेळा गडावर ये-जा करीत या ३५ जणांनी काळजी घेतली. येथील पदभ्रमंती झाल्यानंतर नियमित मार्गावरून गड उतरण्यापेक्षा काहीसा थरार अनुभव देण्यासाठी नेहमीच्या वाटेने न जाता चिंचोळ्या मार्गावरून या मुला-मुलींना गडावरून खाली आणण्यात आले. त्यानंतर पावनखिंडीतील बाजीप्रभू यांच्या पुतळ्यास व पुलवामा शहिदांना अभिवादन करण्यात आले. या अनोख्या पदभ्रमंतीस आमदार ऋतुराज पाटील व सांगवडेचे माजी सरपंच सुदर्शन खोत यांनी सहकार्य केले.
कोट
दिव्यांगांना गंध, स्पर्शज्ञान, आवाज याद्वारे गडकिल्ले पाहण्याची संधी मिळावी याकरिता या मोहिमेचे आयोजन केले होते. त्यात कोल्हापूरसह मुंबई, पुण्यातील ३५ जणांनी सहभाग घेतला. त्यांच्या मदतीकरिता १५ स्वयंसेवक होते.
- शुभम चौगुले, संयोजक
फोटो : १५०२२०२१-कोल-विशाळगड
आेळी : दिव्यांगांसाठी डोळस उपक्रमाअंतर्गत विशाळगडावर पदभ्रमंती आयोजित करण्यात आली होती. यात कोल्हापूरसह पुणे, मुंबईतील दिव्यांग सहभागी झाले होते.