मातीमोल दुकाने पाहून डोळे डबडबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:49 AM2019-08-22T00:49:24+5:302019-08-22T00:49:28+5:30
कोल्हापूर : गादी कारखानदार, ब्रॅँडेड सराफ पेढ्या, फर्निचर विक्रीची आलिशान शोरूम्स यांसह विविध कंपन्या, वित्तीय संस्थांची कार्यालयांनी नटलेल्या व्हीनस ...
कोल्हापूर : गादी कारखानदार, ब्रॅँडेड सराफ पेढ्या, फर्निचर विक्रीची आलिशान शोरूम्स यांसह विविध कंपन्या, वित्तीय संस्थांची कार्यालयांनी नटलेल्या व्हीनस कॉर्नरची श्रीमंती महापुराच्या तडाख्याने एका दणक्यात मातीमोल झाली आहे. महापुरामुळे या व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे न भरून येणारे नुकसान झाले. या नुकसानीची भयानकता बघून व्हीनस कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील व्यावसायिक आजही भेदरलेले आहेत.
महापुराच्या पाण्याने कधी नव्हे इतका व्हीनस कॉर्नर चौक तुडुंब भरला होता. स्टेशन रोड, अप्सरा गल्ली, त्रिवेणी गल्ली, ट्रेझरी गल्ली, हॉटेल पॅव्हेलियन परिसर, असेंब्ली रोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, केव्हीज पार्क, आदी परिसर आठवडाभर पाण्याखाली राहिला. शाहूपुरी आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अशी स्टेशन रोडमार्गे पुराची सीमारेषाच आखली गेली. तसे या परिसराला व्यवसायासाठी अधिक प्राधान्य दिले जात असल्याने येथे मोठ्या शोरुम्सबरोबरच स्टेशनरी, चहा विक्रेते, बेकरी, आइस्क्रीम पार्लर, चारचाकी वाहनांची दुरुस्ती व रंगरंगोटी आदी छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचीही संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे या भागात तळघरांची संख्या तशी कमी आहे; पण तरीही येथे व्यावसायिकांची संख्या मोठी असल्याने त्यांना महापुराचा फटका बसला.
लाखो रुपये किमतीच्या गाद्या, कापूस, किमती फर्निचर भिजले, काही छपाई व्यावसायिकांचा हजारो रुपयांचा कागद भिजला. दुकानातील रंग रस्त्यावर पसरला, असे अंगावर शहारे आणणारे चित्र या भागात होते. कर्जे काढून व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पाणी आजही महापुरानंतरची भयावह अवस्था पाहताना कायम आहे. अशा अवस्थेतही येथील व्यावसायिक उभारण्याची धडपड करत आहेत.
आठ महिन्यांपूर्वीच
उभारला व्यवसाय
पृथ्वीराज देसाई आणि सतीश शेलार या दोघा मित्रांनी नोकरीतील अनुभवाच्या जोरावर आठ महिन्यांपूर्वी ‘ड्रीम कर्टन शॉपी’ सुरू केली. या आलिशान शोरूममध्ये स्प्रिंग व फोमच्या गाद्या, कर्टन, वॉलपेपर, कुशन्स, फर्निचर, संगणक, आदी किमती साहित्य होते; पण रात्रीत आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे हे सर्व सुमारे साडेसात
लाख रुपये किमतीचे साहित्य खराब होऊन मातीमोल बनले. पण हे दोेघे मित्र पुन्हा व्यवसायात उभारी घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यासमोर स्लिपवेल आलिशान गॅलरीही सात महिन्यांपूर्वी सुुरू झाली. तेथेही पाणी शिरल्याने त्यांचेही गाद्या, फर्निचर असे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
गाद्या, कापूस,
रंग रस्त्यावर
अप्सरा चित्रमंदिराच्या पिछाडीस असणाºया गल्लीत सुमारे चार-पाच गादी तयार करण्याचे कारखाने आहेत. तसेच गाद्या विक्रीची मोठमोठी शोरूम्सही आहेत; पण या महापुराच्या कवेत हे गादी व्यावसायिक अडकले. त्यामुळे महापुरानंतर पाण्यात भिजलेल्या गाद्या, कापूस, कर्टन कापड, फोम, रेक्झिन अशा खराब झालेल्या साहित्याचे ढीग रस्त्यावर दिसत होते. एका होलसेल रंगाच्या दुकानातील रंगही यातून सुटले नाहीत. त्यांचे डबे फुटून सर्व रंग रस्त्यावर पसरले होते. या शोरूममधील मालकांसह कर्मचाऱ्यांची साफसफाईसाठी लगबग सुरू होती.