घरांसह शेतीचे नुकसान पाहून डोळे पाणावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:46+5:302021-08-02T04:09:46+5:30
गणपती कोळी कुरुंदवाड : तब्बल आठ दिवसांनी शहरातील पुराचे पाणी ओसरताच शहरवासीय परतत आहेत. त्यामुळे शहर पूर्वपदावर येत ...
गणपती कोळी
कुरुंदवाड :
तब्बल आठ दिवसांनी शहरातील पुराचे पाणी ओसरताच शहरवासीय परतत आहेत. त्यामुळे शहर पूर्वपदावर येत असले तरी घरांसह शेतीचे झालेले नुकसान पाहून पूरग्रस्तांचे डोळे पाणावत आहेत. नुकसानीचा पंचनामा केला जात असला तरी मिळणारी भरपाई तुटपुंजी असल्याने भरपाईपेक्षा पुराचे संकट ओढावू नये यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
२०१९ चे महापूर, कोरोना संकटातून सावरत असताना पुन्हा आलेल्या महापुराने शहराची संपूर्ण आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. कृष्णा, पंचगंगा नदीने शहराला वेढा दिल्याने शहराला बेटाचे स्वरूप आले होते. राजवाडा परिसर आणि माळभागातील काही भाग वगळता संपूर्ण शहर पाण्यात होते. संभाव्य महापुराचा धोका ओळखून नागरिकांनी जनावरांसह वेळीच स्थलांतर झाल्याने जीवितहानी टळली असली तरी न भरून येणारे आर्थिक नुकसान झाले आहे.
शहरातील सुमारे ४६०० घरांत पुराचे पाणी आले होते. त्यातील २६०० घरे पूर्णपणे बुडाली होती. शहराची संपूर्ण शेती (१७०० हेक्टर) अनेक दिवस पाण्यात राहिल्याने सोयाबीन, भात, भुईमूग, भाजीपाला तर कुजुन गेला आहे. शिवाय ऊस पीकही धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतीसह घरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी, हाताला काम नसल्याने मजूर वर्ग तर दुकानदार छोटे-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसानीमुळे सर्वच घटकांना महापुराचा फटका बसला आहे.
पूर ओसरताच स्थलांतरित झालेले नागरिक परतले असून घरांचे, शेतीचे नुकसान पाहून डोळे पाणावत आहेत. मात्र काळजावर दगड ठेवून आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देत सावरत आहेत. पालिका प्रशासन, महसूल विभाग पंचनामा करत असले तरी मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजीच असल्याने पुराचे इतके गंभीर संकट ओढवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
पुराच्या पाण्याने शहरातील ऐंशी टक्के भाग पाण्यात होता. राजवाडा व माळभागातील मोजकाच भाग उंचावर असल्याने पाण्यापासून वाचला होता मात्र या नागरिकांनाही नुकसानीचा फटका बसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत पूरग्रस्त नागरिकांना निवारा, जेवण, आर्थिक मदतीचा हात देत माणुसकी दाखविली त्यामुळे पूरग्रस्तांतून समाधान व्यक्त होत आहे.
कोट...
शहराच्या चारही बाजूंनी पुराचे पाणी आल्याने शहराला बेटाचे स्वरूप आले होते. शहरातील मोजकाच भाग पाण्यापासून वाचला असला तरी या भागातील नागरिकांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आधार दिला होता. त्यामुळे २०१९ च्या निकषाप्रमाणे संपूर्ण शहर पूरग्रस्त जाहीर करावे.
दादासो पाटील
माजी नगराध्यक्ष, कुरुंदवाड
फोटो
०१ कुरुंदवाड
फोटो - कुरुंदवाड शहरातील पुराचे पाणी ओसरताच घर दुकाने स्वछ करण्यात घरचे संपूर्ण कुटुंब मग्न आहेत.