उज्ज्वल भविष्यासाठी ‘नॅक’ला सामोरे जा
By admin | Published: January 2, 2015 11:31 PM2015-01-02T23:31:06+5:302015-01-03T00:13:04+5:30
जगन्नाथ पाटील : शिवाजी विद्यापीठात जाणीव जागृती कार्यशाळेचा प्रारंभ
कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोग अथवा राज्य शासनाने सक्ती केली आहे म्हणून नव्हे तर, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शैक्षणिक संस्थांनी ‘नॅक’ मूल्यांकनाला सामोरे जायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) प्रभारी सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी आज, शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे ‘नॅक’च्या सहकार्याने महाविद्यालये व संस्थांसाठी आयोजित केलेल्या दोनदिवसीय जाणीव जागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.
डॉ. पाटील म्हणाले, खरे तर गुणवत्ता ही ज्या-त्या संस्थेची जबाबदारी असते; तथापि, पण गुणवत्ता आणि दर्जा यांच्याविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी ‘नॅक’ची गरज आहे. स्पर्धेच्या युगात अशा संस्थेची नितांत गरज होती. ‘नॅक’च्या बाबत आमच्या उद्दिष्टाच्या साधारणत: १५ टक्के उद्दिष्टपूर्तीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारतीय शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेच्या बाबतीत खूप मोठा पल्ला पार करायचा आहे म्हणूनच राष्ट्रीय उच्चशिक्षण अभियानांतर्गत गुणवत्तेबाबत जगजागृती करण्याची जबाबदारी ‘नॅक’ने उचलली आहे. याचाच भाग म्हणून अशा कार्यशाळा होत आहेत. जागतिक स्पर्धेत आणि खाजगी विद्यापीठांच्या युगात संस्थांना टिकण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च पात्रता व कौशल्यांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. हा विकास केला तर आपले विद्यार्थी जागतिक पातळीवरील कोणत्याही स्पर्धेचा आत्मविश्वासाने सामना करू शकतील. तसेच त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.
कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, ‘नॅक’ ही एकवेळची नव्हे, तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी कसून तयारी करणे आवश्यक आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून झाले. कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. व्ही. बी. जुगळे उपस्थित होते. बीसीयुडी
संचालक डॉ. अर्जुन राजगे यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. व्ही. बी. जुगळे यांनी आभार मानले. दरम्यान, डॉ. पाटील यांनी दूरशिक्षण केंद्राची पाहणी केली. (प्रतिनिधी)
गुणवत्तापूर्ण उपक्रम...
आपल्या देशातील ‘अ’ मानांकित संस्थेतील तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम अमेरिकेतील चार वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष मानला जातो, इतके त्याचे महत्त्व प्रस्थापित झाले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांकडून फीडबॅक, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, आयसीटी बेस्ड अध्यापन प्रणालीचा अंगीकार व आग्रह अशासारख्या गुणवत्तापूर्ण उपक्रमांची सुरुवात ‘नॅक’मुळे शैक्षणिक संस्थांमध्ये झाली.