चेहरे - वाचावे असे काही
By admin | Published: March 3, 2017 12:27 AM2017-03-03T00:27:47+5:302017-03-03T00:27:47+5:30
चित्र वाचता येणं तुमच्या विचार, तर्क, बुद्धिमत्तेची कसोटी असते खरी.
चित्रं पाहायची असतात की वाचायची असतात, असा प्रश्न कुणी आपणास केला, तर आपण विचारणाऱ्याला वेड्यात काढू. सर्वसामान्य माणसाचं उत्तर हेच असणार की, चित्र पाहायची असतात. पण, मी अनुभवाने सांगेन, चित्र वाचता येतात. चित्र वाचता येणं तुमच्या विचार, तर्क, बुद्धिमत्तेची कसोटी असते खरी. चित्रपट, पत्रकारिता, जाहिरात क्षेत्रात आपल्या कॅमेऱ्याची कमाल दाखविणारा एक छायाचित्रकार होता. गौतम राजाध्यक्ष त्याचं नाव. या माणसाचं एक सचित्र पुस्तक आहे. ‘चेहरे’ असं त्याच शीर्षक आहे; परंतु तोच प्रश्न मी विचारीन - चेहरे पाहायचे असतात की वाचायचे? याचं उत्तर देणारं हे पुस्तक.
गौतम राजाध्यक्ष मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये शिकले. शिकत असताना त्यांचे वर्गमित्र, मैत्रिणी कोण? तर शबाना आझमी, कविता कृष्णमूर्ती, नितीन मुकेश, पंकज उधास, प्रीती सागर, फारुख शेख. शिकत असताना त्यांचे कॉलेज गायन, नाटक, चित्रपट सर्व क्षेत्रांतील पारितोषिके पटकावत असायचे. पारितोषिके मीना कुमारीच्या हस्ते मिळायचा तो काळ! कॉलेज संपलं तसं गौतम राजाध्यक्ष ‘लिंटास’ नावाच्या प्रख्यात जाहिरात कंपनीत छायाचित्रकार म्हणून रुजू झाले. शोभा डे यांच्यामुळे त्यांना चित्रपट विषयक नियतकालिकात लेखनाची संधी मिळाली. ‘स्टारडस्ट’, ‘सिनेबिझ’, ‘फिल्मफेअर’मध्ये नट, नट्यांचे दिलकश फोटो काढून ते छापायचे. पुढे ते लेख, मुलाखती लिहू लागले. बॉलिवूडमध्ये प्रघात होऊन गेला होता. गौतम राजाध्यक्षांनी काढलेला फोटा छापून येईपर्यंत तुम्हाला कोणी नट, नटी मानणारच नाही. ही असते एका कलाकाराच्या कलासाधनेची पावती. अशा काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचं एक इंग्रजी पुस्तक ‘फेसेस’ सन १९९७ मध्ये प्रकाशित झालं. ते पुस्तक ज्याच्याकडे तो प्रतिष्ठित मानला जाऊ लागला. निखिल वागळे त्यावेळी ‘षट्कार’ नावाचे क्रिकेटला वाहिलेले मासिक चालवायचे. ते चांगलं चाललं तसं त्यांच्या मनात कल्पना आली की, आपण चित्रपटावर आधारित मराठी मासिक चालवावं. ‘चंदेरी’ नाव ठरलं; पण मासिक क्लिक व्हायचं तर राजाध्यक्षांचे फोटो हवेत. ‘मानसचित्र’ नावाचं सदर सुरू करायचं ठरलं. फोटोसह लेख असं त्या सदराचं स्वरूप होतं. या सदरातील चित्र व लेखांचा संग्रह म्हणजे ‘चेहरे’ हे पुस्तक होय.
एकापेक्षा एका अप्रतिम चित्रांनी नटलेल्या या कॉफी टेबल बुकचं वैशिट्य असं की, यातील चित्र वाचता येतात अन् लेख पाहता येतात. मी तुम्हाला नुसते एक दोन किस्से सांगतो. गौतम राजाध्यक्षांच्या स्टुडिओमध्ये एकदा फोन खणखणतो. तो आलेला असतो बॉम्बे हाऊसमधून. बॉम्बे हाऊस म्हणजे टाटा उद्योग समूहाचे मुख्यालय. जे. आर. डी. टाटांचे ‘की नोट’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे. त्याच्या मुखपृष्ठावर तुम्ही काढलेला फोटो टाकायचे ठरलेय. यापूर्वी एका फोटोग्राफरने काढलेले फोटो जे. आर. डीं.ना पसंत पडलेले नाहीत.’ गौतम राजाध्यक्ष आॅफरनेच गलितमात्र होऊन नकार देतात; पण पलीकडून ऐकतील तर खरे! गौतम राजाध्यक्षांनी चौकशी केली की, पूर्वीचे फोटो दाखवाल का? म्हणजे ते पाहून मला ठरविता येईल. त्यांनी फोटो पाहिले नि नकाराचं कारण विचारलं. तर सांगण्यात आलं की, फोटोवरच्या सुरकुत्या जे. आर. डीं.ना पसंत पडल्या नाहीत. गौतम राजाध्यक्षांनी काढलेले फोटो जे. आर. डीं.ना पसंत पडले. त्यांनी काही केले नव्हते. कॅमेऱ्यात डिफ्यूस लेन्स बसविली. सुरकुत्या गायब. जे. आर. डी. फिट अँड फाईन!
एकदा गौतम राजाध्यक्ष उटी, लव्हडेल, वेलिंग्टनच्या निलगिरी वनात भटकंतीसाठी गेले असताना वाटेत कुनूर नावाचे गाव लागले. त्यांना कळले की, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ येथे राहतात. फोटो काढायला मिळेल तर काय मजा येईल ना? वाटलं अन् यश आलं. गंमत म्हणजे गौतम राजाध्यक्ष सांगतील ते नि तसे कपडे माणेकशॉ यांनी घातले. त्याक्षणी तर फिल्ड मार्शल गौतम राजाध्यक्षच होते. हे वेगळे सांगायला नको. अशी पर्वणी म्हणजे गौतम राजाध्यक्षांना नेहमीच मनातील शंका दूर करायची संधी वाटत आली आहे. त्यावेळी अशी कुणकुण होती की, इंदिरा गांधी अन् माणेकशॉ यांचे पटायचे नाही. गौतम राजाध्यक्षांनी शंका विचारल्यानंतर माणेकशॉनी केलेला खुलासा मुळातच वाचायला हवा. अफवा होती की, माणेकशॉ देशावर मिलिटरी हुकूमत आणणार आहेत. माणेकशॉना पंतप्रधान इंदिरा गांधी बोलावतात. अर्थात जाब विचारण्यासाठी. माणेकशॉ विनंती करतात, ‘तुम्ही माझ्या आधिकारात हस्तक्षेप करू नये. मी तुमच्या सत्तेत हस्तक्षेप करणार नाही.’ कोणताही देश वाचतो, घडतो ते हक्क आणि कर्तव्यांच्या सीमारेषांवर! मोठी माणसं त्या ओळखतात. म्हणून ती मोठी असतात.
सचिन तेंडुलकरांची निष्पापता, माधुरी दीक्षितचं स्पंजाप्रमाणे समजून घेणं, एम. एफ. हुसेन यांना फकीर व्हावसं वाटणं, शबाना आझमीचे आयुष्यभरचे सारे फोटो फक्त गौतम राजाध्यक्षांचेच. काय काय गमती असतात. आयुष्यात ही सारी कमाल असते. फक्त कॅमेरा नि लेन्सची! पण, मी सांगू तुम्हाला त्याच्या पलीकडचा चित्रकाराच्या आतला माणूस, मित्र, मानसशास्त्रज्ञ, कलाकार, संवादक, लेखक, कल्पक अशा किती तरी छटा हे पुस्तक समजावतं. गौतम राजाध्यक्ष एकदा रतन टाटांचे फोटो काढायला गेले. ते नाखूश. मनासारखे फोटोच निघेनात. लक्षात येतं की, हा माणूस प्राण्यांबरोबर खुलतो. ते टाटांना कुत्र्याशी नेहमीसारखे खेळत राहायला सांगतात. फोटो मनासारखे मिळून जातात.
लिथो साईजच्या आर्ट पेपरवर छापलेले हे ३५० पानांचे देखणे पुस्तक सुमारे पासष्ट सेलेब्रिटीजचे हे सचित्र चरित्रच! खरं तर ‘कॉफी टेबल बुक’ हे चाळायसाठी म्हणून तयार केलं जातं. पण, गौतम राजाध्यक्षांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा यात घेतलेला धांडोळा वाचताना लक्षात येतं की, या माणसांमध्ये असं काही एक रसायन भरलेलं असतं, ते त्याला मोठं करतं. व्ही शांतारामांचे सर्व चित्रपट कलात्मक का होते? विजया मेहतांच्या अभिनयाचे रहस्य काय? शेखर कपूर सी.ए. असताना चित्रपटसृष्टीत कोणत्या फॅशनने आला? तीनही खान (सलमान, शाहरुख, आमिर) एक असूनही वेगळे कसे? हे सारं कुतूहल निर्माण करणारं नि शमवणारं हे पुस्तक वाचणं, पाहाणं हा एक कलात्मक समाधीचा भाग आहे. जी माणसं निकराच्या क्षणी स्वत:चं जीवन, कौशल्य पणाला लावतात. जे आत्ममग्न समाधीत स्वत:स गाढून घेतात. तेच पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसा, कला, प्राप्त करतात. जगात कुणालाच काही नशिबाने मिळत नाही. जे मिळते ते तुमच्या प्रयत्नांचेच फळ असते.
-डॉ. सुनीलकुमार लवटे
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.