कर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:23+5:302021-07-07T04:29:23+5:30

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि ...

Facilitate the loan process, create awareness about documents | कर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा

कर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा

Next

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि कागदपत्रांअभावी बहुतांश लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता आणावी. कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींनी दिल्या.

येथील शासकीय विश्रामगृहात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आयोजित जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँका, सहकारी आणि खासगी बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. महामंडळांतर्गत येणाऱ्या कोणत्याही बँकेने कर्जपुरवठा थांबवलेला नाही. कर्ज घेतलेल्या युवकांकडून त्याचा परतावा सुरळीत होत आहे. राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून, याच पद्धतीने इतर बँकांनी कक्ष स्थापन करावा. बोगस कर्जदारांना पाठीशी घातले जाणार नाही, पात्र लाभार्थ्याला न्यायापासून वंचित ठेवले जाणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २७ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्याकरिता योजनांची माहिती देणारे ऑनलाईन शिबिर घेतले जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, कौशल्य विकास रोजगारचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने, महामंडळाचे जिल्हा समन्वयक सतीश माने, आदी उपस्थित होते.

चौकट

२५७७ लाभार्थ्यांना २१६ कोटींचा कर्ज पुरवठा

वैयक्तिक कर्ज योजनेत ६ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यातील २,५७७ लाभार्थ्यांना सुमारे २१६ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला. त्यातील २,२५३ लाभार्थ्यांना १३ कोटी रुपयांचा व्याज परतावा करण्यात आला असल्याची माहिती सतीश माने यांनी दिली.

चौकट

कागदपत्रांअभावी प्रकरणे प्रलंबित

बँकांकडून लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा सुरु आहे. कागदपत्रांअभावी उर्वरित प्रकरणे प्रलंबित असल्याचे सतीश माने यांनी सांगितले. कर्ज पुरवठ्यासाठी बँका मिळत नसल्याचा गैरसमज नागरिकांनी मनातून काढावा. कर्ज प्रकरणासाठी कोणत्याही एजंटची मध्यस्थी लाभार्थ्यांनी घेऊ नये. अधिक माहितीसाठी समक्ष बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकांच्या प्रतिनिधींनी केले.

फोटो (०५०७२०२१-कोल-अण्णासाहेब पाटील महामंडळ बैठक, ०१) : कोल्हापुरात सोमवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या बँकेचे अधिकारी, प्रतिनिधींना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विविध सूचना केल्या. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Facilitate the loan process, create awareness about documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.