दर्जेदार शिक्षणासाठी सोयीसुविधा देणार : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:04 PM2020-06-19T17:04:33+5:302020-06-19T17:08:01+5:30
जिल्हा परिषदेत आयोजित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
कोल्हापूर : यापुढच्या काळात खासगीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांना उतरावे लागेल. त्यासाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी महाराष्ट्र शासन बांधील असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
जिल्हा परिषदेत आयोजित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीमुळे मी चिंतेत आहे. रस्त्यावरचा एखादा खड्डा दुरुस्त करता येईल; परंतु विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणे योग्य नाही. ऑनलाईन शिक्षणाची चर्चा होत असली तरी आजही अनेक पालकांकडे त्यासाठीचे आवश्यक मोबाईल नाहीत, ज्यांचे हातावर पोट आहे असे पालक मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही. अशांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, अशी आमची इच्छा आहे.
यावेळी सभापती हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे, रूपाली कांबळे, संगीता पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अजयकुमार माने, रविकांत आडसूळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी स्वागत केले; तर उपशिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी आभार मानले.