इलेक्ट्रॉनिक हुंडीद्वारे गुप्तदानाची सोय
By admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:36+5:302016-01-02T08:34:36+5:30
‘बँक आॅफ इंडिया’तर्फे राज्यातील पहिल्या हुंडीचा प्रारंभ
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या देशभरातील भाविकांना देवीच्या चरणी पैसा दान करण्याची इच्छा असते. त्याकरीता चोवीस तास सुरू असणारी राज्यातील पहिली ‘इलेक्ट्रॉनिक हुंडी’ बँक आॅफ इंडियातर्फे येथे बसविण्यात आली. या हुंडीचे लोकार्पण शुक्रवारी जिल्हाधिकारी अमित सैनी व त्यांच्या पत्नी अंशु सैनी यांच्या हस्ते झाले.
थेट देवस्थानकडे गुप्तधन येणारी हुंडी राज्यात मोठ्या संस्थानांकडे अद्यापही नाही. या हुंडीद्वारे भाविकांना २४ तास आपल्या मर्जीने केव्हाही गुप्तदान करता येईल. केंद्राच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेवर आधारीत ही हुंडी आहे. या सोयीबद्दल डॉ. सैनी यांनी बँकेचे आभार मानले. यावेळी बँकेचे विभागीय व्यवस्थापक आर. गणेशन, उपविभागीय व्यवस्थापक मिलिंद पाठक, अग्रणी जिल्हा प्रबंधक एम. जी. कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे यांच्यासह अधिकारी उपस्थित होता.