सुविधांचा 'बाजार', संपर्काचा 'गेट' बंद
By Admin | Published: January 7, 2015 11:34 PM2015-01-07T23:34:03+5:302015-01-07T23:52:25+5:30
शाहू उद्यानाची दुरवस्था : नवीन शौचालयांचे काम बंद, नगरसेवकांचा नागरिकांशी संवादाचा अभाव
कोल्हापूर : अंतर्गत खराब रस्ते, शाहू उद्यानाची झालेली दुरवस्था अन् काही दिवसांपासून बंद असलेल्या शौचालयाचे काम अशा स्थितीतला हा बाजारगेट प्रभाग आहे. गेल्या चार वर्षांपासून स्थानिक नगरसेवकांचा संपर्क नसल्याची ओरड नागरिक करत आहेत. त्याचबरोबर आश्वासने दिलेली विकासकामे झाली नसल्याचे नागरिक बोलत आहेत. त्यामुळे एकंदरीत या प्रभागात समस्याच समस्या असल्याची स्थिती आहे.
बाजारगेट या प्रभागात बहुतांश कुंभार, जोशी-गोंधळी, मुस्लिम समाजाची सर्वाधिक मते आहेत. गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुकीत याच समाजाची मते निर्णायक ठरली आहेत. बाजारगेट, कुंभार गल्ली, गंगावेशमधील शाहू उद्यान, ऋणमुक्तेश्वर मंदिराची एक बाजू, जोशी गल्ली, गांधी तरुण मंडळ, लोणार गल्ली, गवळी गल्ली, पापाची तिकटी, रोहिडेश्वर तरुण मंडळ, मिंच गल्ली, घोडा पॅसेज अशी अस्ताव्यस्त रचना आहे.
गेल्या निवडणुकीत सुमारे सहा हजार मतदारांची नोंद आहे. त्याचबरोबर या प्रभागात महापालिका मुख्य इमारत, शनिवार पेठ पोस्ट कार्यालय अशी रचना आहे. गतवर्षी अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आला पण, निवडून आल्यानंतर नगरसेवकांचा चार वर्षांत जनसंपर्क कमी झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
शाहू
उद्यानाची दुर्दशा...
शहरातील नावाजलेले उद्यान म्हणून श्री शाहू उद्यानाची पूर्वी ओळख होती. उद्यानासमोर ऋणमुक्तेश्वर मंदिरचा रस्ता. रोज सकाळी सहा वाजल्यापासून या रस्त्यावर भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. पण, त्याचशेजारी कोंडाळ्याची दुर्गंधी ओसंडून वाहते. त्यामुळे या मार्गावरील ये-जा करणाऱ्यांना अक्षरश: तोंडावर रूमाल लावून जावे लागते.
दोन प्रभागांत अडकला गंगावेश रस्ता...
पापाची तिकटी ते गंगावेश चौकापर्यंत रस्ता हा महालक्ष्मी मंदिर व बाजारगेट या दोन प्रभागांत अडकला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता खराब झाला आहे. दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असलेल्या अक्षरश: खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनधारकांना येथून जाताना कसरत करत जावे लागते आहे. या रस्त्याकडे नगरसेवकांबरोबर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
विद्यमान नगरसेवक श्रीकांत बनछोडेविद्यमान नगरसेवक श्रीकांत बनछोडे
विकासकामांंचा दावा...
मिंच कॉम्प्लेक्स, सरदार बोळ, महापालिकेजवळील रस्ता, पापाची तिकटी-लोणार गल्लीतील रस्ता उर्वरित दहा महिन्यांत करणार
प्रभागात ८० टक्के विकासकामे, सुमारे दीड कोटींची विकासकामे
उद्याचा प्रभाग क्रमांक - ३९ शिवाजी विद्यापीठ
कुंभार गल्ली येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या शौचालयांचे काम काही कारणास्तव बंद आहे. कोणत्याही स्थितीत उर्वरित कालावधीत हे काम पूर्ण केले जाईल. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे.
- श्रीकांत बनछोडे,
नगरसेवक, बाजारगेट प्रभाग