मायक्रो फायनान्सविरोधात १०० नंबरला तक्रार देण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 06:17 PM2020-10-07T18:17:49+5:302020-10-07T18:22:19+5:30
bjp, kolhapurnews, police, maicrofinance मायक्रो फायनान्सच्या जाचक वसुलीविरोधात पोलीस नियंत्रण कक्षाकडे १०० नंबरवर तक्रार दाखल करण्याची सोय करून देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी बुधवारी दिली. मायक्रो फायनान्स तक्रारींबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही, असा दिलासा यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिला.
कोल्हापूर : मायक्रो फायनान्सच्या जाचक वसुलीविरोधात पोलीस नियंत्रण कक्षाकडे १०० नंबरवर तक्रार दाखल करण्याची सोय करून देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी बुधवारी दिली. मायक्रो फायनान्स तक्रारींबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही, असा दिलासा यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिला.
मायक्रो फायनान्सच्या वसुली यंत्रणेकडून मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम चालू आहे. तेव्हा ही यंत्रणा ताळ्यावर आणून सर्वसामान्य गरजू महिला आणि नागरिकांची यातून सुटका करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे केली.
चिकोडे म्हणाले, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरू असणारी वसुलीची पद्धत जाचक असून, पैसे गोळा करण्यासाठी घरातील किमती वस्तू उचलून नेण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे.
यावेळी सरचिटणीस हेमंत आराध्ये, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, अमोल पालोजी, जिल्हा चिटणीस सुनीलसिंह चव्हाण उपस्थित होते.