मनुष्यबळाचा तुटवडा, कच्चा मालाच्या दरवाढीचा सामना करत उद्योगचक्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:30+5:302021-05-08T04:23:30+5:30

कोल्हापूर : कुशल, अनुभवी मनुष्यबळाचा तुटवडा आणि कच्च्या मालाची दरवाढ या अडचणींचा सामना करत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सुरू ...

Facing manpower shortage, rising raw material prices, the industry cycle begins | मनुष्यबळाचा तुटवडा, कच्चा मालाच्या दरवाढीचा सामना करत उद्योगचक्र सुरू

मनुष्यबळाचा तुटवडा, कच्चा मालाच्या दरवाढीचा सामना करत उद्योगचक्र सुरू

Next

कोल्हापूर : कुशल, अनुभवी मनुष्यबळाचा तुटवडा आणि कच्च्या मालाची दरवाढ या अडचणींचा सामना करत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सुरू आहेत. कोरोनाच्या स्थितीमध्येही काम असूनदेखील या अडचणींमुळे उद्योगचक्राची गती काहीशी मंदावली आहे.

गेल्यावर्षी उद्योगांना कोरोनाचा फटका बसला. त्यातून सावरत नोव्हेंबरपासून बऱ्यापैकी उद्योग पूर्वपदावर आले. निर्यात आणि देशाअंतर्गत बाजारपेठेत पुरवठा करणाऱ्या उद्योगांतील कामांचे प्रमाण वाढले. त्यातच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रासमोर अडचण निर्माण झाल्या आहेत. याठिकाणी फौंड्रीची संख्या अधिक आहे. त्यामध्ये बिहार, उत्तरप्रदेशमधून आलेले मजूर, कामगार कार्यरत आहेत. कोरोना वाढत असल्याने हे मजूर, कामगार आपआपल्या राज्यांमध्ये जात आहेत. त्यामुळे उद्योगांना मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. स्टील, सीआरसी स्क्रॅॅप, पिग आर्यन, आदी कच्चा मालाचे दर हे मार्चपासून वाढत आहेत. त्यांच्या दरांमध्ये सध्या १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्कऑर्डर आणि उत्पादन पुरवठा करण्याचा दर आधी निश्चित झाल्याने जिल्ह्यातील उद्योजकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. कच्च्या मालाच्या दर नियंत्रणामध्ये केंद्र, राज्य सरकारने लक्ष घालण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.

उद्योजक काय म्हणतात?

फौंड्रीमध्ये काम करणारे परराज्यातील मजूर, कामगार हे कोरोनामुळे त्यांच्या गावी जात आहेत. त्यामुळे या फौंड्री स्पेशालिस्ट असलेल्या मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. कच्च्या मालाचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे उद्योगांची अडचण झाली आहे. कच्च्या मालाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने लवकर लक्ष द्यावे.

-अतुल पाटील, अध्यक्ष, स्मॅॅक.

उद्योगांतील कामांचे प्रमाण चांगले आहे. मात्र, कुशल आणि अनुभवी मनुष्यबळाची कमतरता, कच्च्या मालाची दरवाढ सध्या अडचणीची ठरत आहे. या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने उद्योगांची गती काहीशी मंदावली आहे.

- श्रीकांत पोतनीस, अध्यक्ष, गोशिमा.

कोरोनाच्या नियमांचे पालन करत उद्योग सुरू आहेत. उद्योगांना कामे आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून कच्चा माल, इंधन आणि मालवाहतुकीची दरवाढ होत असल्याने आमच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्या लवकर कमी होणे आवश्यक आहे.

- उत्तम पाटील, उद्योजक, शिरोली एमआयडीसी.

चौकट

आधी पैसे, मग कच्च्या मालाचा पुरवठा

जिल्ह्यातील उद्योगांना स्टील, ऑईल, पिग आर्यन, ग्राफाईट, आदी कच्चा माल लागतो. त्याचा पुरवठा मुंबई, पुणे, जालना, नागपूर, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम येथून होतो. पूर्वी कच्चा माल घेताना ३० ते ४५ दिवसांचे क्रेडिट उद्योजकांना मिळत होते मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कच्चा माल पुरवठा करणाऱ्यांनी हे क्रेडिट बंद केले आहे. आधी पैसे दिले, तरच त्यांच्याकडून कच्च्या मालाचा पुरवठा होत आहे. ही नवी अडचण निर्माण झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.

Web Title: Facing manpower shortage, rising raw material prices, the industry cycle begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.